नवी दिल्ली - डाटा लीकप्रकरणी पुन्हा एकदा फेसबुक कंपनी अडचणीत सापडली आहे. कारण फेसबुकचीच मालकी असलेल्या इनस्टाग्रामच्या लाखो वापरकर्त्यांचा डाटा लीक झाल्याचा प्रकार समोर आला आहे. हा डाटा मुंबईची सोशल मीडिया मार्केटिंग कंपनी क्रित्रबॉक्सने मिळविल्याची कंपनीकडून चौकशी केली जात आहे.
इनस्टाग्रामच्या लीक झालेल्या डाटाबेसमध्ये ४ कोटी ९० लाख लोकांचा डाटा आहे. यामध्ये फुड ब्लॉगर, सेलेब्रिटी आणि सोशल मीडियात प्रभाव असलेल्या व्यक्तींचा समावेश आहे. प्रत्येक रेकॉर्डमध्ये संपूर्ण परिचय, प्रोफाईल फोटो, फॉलोअर्सची संख्या, त्यांचे ठिकाण आणि खासगी संपर्क क्रमांक यांची माहिती आहे.
इनस्टाग्रामच्या प्रवक्त्याने सांगितले की, तृतीय पक्षाने इनस्टाग्रामचा डाटा चुकीच्या पद्धतीने आणि नियमांचे उल्लंघन करून ठेवल्याबाबत चौकशी सुरू आहे. क्रित्रबॉक्सकडे असलेले ईमेल आणि फोन क्रमांक हे इनस्टाग्रामवरूनच आल्याचे स्पष्ट झाले नाही. असे असले तरी तृतीय पक्षाने वापरकर्त्यांचा डाटा चुकीच्या पद्धतीने हाताळण्याचा विषय आम्ही खूप गंभीरपणे घेत आहोत. त्यामुळेच आम्ही नेमके काय घडले आहे, हे त्वरित जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहोत.
काय करते क्रित्रबॉक्स कंपनी
क्रित्रबॉक्स (Chtrbox) ही वेब डेव्हलपेंट कंपनी आहे. ही कंपनी सोशल मीडियात प्रभावी असलेल्या व्यक्तींना जाहिरांतीसाठी पैसे देते. त्यातून विविध ब्रँड असलेल्या कंपन्यांना सोशल मीडियात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचता येते.
डाटा लीक झाल्याची बाब प्रथम सुरक्षा संशोधक अनुराग सेन यांनी शोधून काढली होती. यापूर्वीही २०१७ मध्ये ६० लाखांहून अधिक वापरकर्त्यांचा इनस्ट्राग्रामचा डाटा लीक झाल्याचे समोर आले होते.