सॅनफ्रान्सिस्को – भारतानंतर अमेरिकेतही बंदी येण्याची शक्यता असलेल्या टिकटॉकला मायक्रोसॉफ्ट संजीवनी देणार आहे. टिकटॉकची 15 सप्टेंबरपर्यंत खरेदी करण्याकरता मायक्रोसॉफ्ट सातत्याने टिकटॉकची मालकी असलेल्या बाईटडान्स कंपनीशी चर्चा करत आहे. ही माहिती मायक्रोसॉफ्टने ब्लॉग पोस्टमधून आज दिली आहे.
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना टिकटॉकवर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे मायक्रोसऑफ्ट टिकटॉकची खरेदी न करता कराराने टिकटॉकची मालकी घेईल, असा अंदाज एका अमेरिकन माध्यमाने वर्तविला आहे. या करारात चार देशांमध्ये टिकटॉकची मालकी आणि वापर करण्याचे हक्क मायक्रोसॉफ्टकडे येण्याची शक्यता आहे. त्याबाबत मायक्रोसॉफ्टची अमेरिकन सरकार व डोनाल्ड ट्रम्प यांच्याबरोबर चर्चा सुरू आहे.
टिकटॉकमध्ये काही शेअर खरेदी करण्याकरता मायक्रोसॉफ्टकडून काही गुंतवणूकादारांनाही निमंत्रित केले जावू शकते. टिकटॉकच्या सर्व वापरकर्त्यांचा डाटा अमेरिकेत सुरक्षित राहण्याची मायक्रोसॉफ्टकडून खात्री दिली जाणार आहे. गेल्या आठवड्यात ट्रम्प यांनी अध्यक्षांना मिळणाऱ्या कार्यकारी आदेशांचा वापर करून चीनची मालकी असलेल्या टिकटॉकवर बंदी घालणार असल्याचे जाहीर केले होते.
चिनी सरकारचे कंपनीवर नियंत्रण असल्याचे आरोप टिकटॉकने आजवर वारंवार फेटाळले आहेत. दरम्यान, ट्रम्प प्रशासन आणि चीनच्या सरकारमध्ये व्यापार, कोरोना महामारीचा संसर्ग आदी कारणांवरून तणावाची स्थिती आहे.