नवी दिल्ली - तुम्ही वाहन खरेदी करण्याचे नियोजन करणार असाल तर ही महत्त्वाची बातमी आहे. देशातील सर्वात मोठी कार उत्पादक कंपनी मारुती सुझुकीने हॅचबॅक स्विफ्ट आणि सीएनजी मॉडेलच्या किमती वाढविल्या आहेत. या दरवाढीमुळे मारुतीची निवडक वाहनांच्या किमती १५ हजार रुपयापर्यंत वाढणार आहेत.
मारुतीच्या वाहनांच्या किमती (एक्स शोरुम दिल्ली) १५ हजार रुपयापर्यंत वाढणार आहेत. ही दरवाढ सोमवारपासून (१२ जुलै) लागू होणार आहे. दर वाढ होण्यापूर्वी स्विफ्टची किंमत ५.७३ लाख रुपये ते ८.२७ लाख रुपये (एक्स शोरुम दिल्ली) होती. मारुती सुझुकीकडून सीएनजीच्या विविध मॉडेलची विक्री करण्यात येते. यामध्ये अल्टो, सेलेरिओ, एस-प्रेसो, वॅगनॉरआर, इको आणि एरटिगा आदी मॉडेलचा समावेश आहे. या वाहनांच्या किमती ४.४३ लाखापासून ९.३६ लाखापर्यंत आहे. कंपनीने चालू वर्षात एप्रिलमध्ये सेलिरिओ आणि स्विफ्ट वगळता सर्व मॉडेलच्या किंमत २२,५०० रुपयापर्यंत वाढविली होती. वाहनांसाठी लागणाऱ्या सुट्ट्या भागांच्या किमती वाढविल्याने मारुतीने वाहनांची किंमत वाढविली आहे.
हेही वाचा-निसर्गाचा कहर; उत्तरप्रदेशमध्ये विविध ठिकाणी वीज कोसळून तब्बल 41 जणांचा मृत्यू
यापूर्वी मारुतीकडून वाहनांच्या किमतीत तीनदा दरवाढ
मारुती सुझुकीने १६ एप्रिलमध्ये वाहनांच्या किमती (दिल्ली एक्सशोरुम) सर्व मॉडेलवर १.६ टक्क्यांनी वाढविल्या आहेत. तर १८ जानेवारीला कंपनीने निवडक मॉडेलवर ३४ हजार रुपयांपर्यंत किमती वाढविल्या आहेत. मारुती सुझुकीकडून अल्टो ते एस-क्रोस अशा २.९९ लाख ते १२.३९ लाखापर्यंतच्या (एक्स-शोरुम किंमत) वाहनांची विक्री करण्यात येते.
हेही वाचा-केरळमध्ये आढळला "झिका" विषाणू, जाणून घ्या लक्षणे
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने वाहनांच्या विक्रीवर परिणाम-
कोरोनाच्या दुसऱ्या लाटने देशभरातील प्रवासी वाहनांच्या विक्रीवर परिणाम झाला आहे. एप्रिल महिन्याच्या तुलनेत मे महिन्यात प्रवासी वाहनांची विक्री ६६ टक्क्यांनी कमी होऊन ८८.०४५ वाहनांची विक्री झाली आहे. ही माहिती वाहन उद्योगांची संघटना एसआयएएमने दिली आहे. एप्रिल महिन्यात एकूण २,६१,६३३ वाहनांची विक्री झाली होती. सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्युचर्रसच्या (एसआयएएम) आकडेवारीनुसार एप्रिलच्या तुलनेत मे महिन्यात दुचाकी वाहनांच्या विक्रीत ६५ टक्क्यांनी घसरून होऊन ३,५२,७१७दुचाकींची विक्री झाली आहे. यापूर्वी एप्रिलमध्ये ९,९५,०९७ दुचाकींची विक्री झाली होती. एप्रिलच्या तुलनेत मे महिन्यात मोटरसायकलच्या विक्रीत ५६ टक्के घसरण झाली आहे.
हेही वाचा-ट्विटर बॅकफुटावर, नव्या आयटी नियमांचे पालन; 22 हजार 564 खाती हटवली