नवी दिल्ली - वाहन उद्योगावरील (ऑटो) जीएसटी कमी करावा, अशी अपेक्षा महिंद्रा ग्रुपचे चेअरमन आनंद महिंद्रा यांनी व्यक्त केली. त्यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला मदत होईल, असे त्यांनी म्हटले आहे.
ऑटोमोटिव्ह डिलर्स असोसिएशनचे माजी अध्यक्ष जॉन के. पॉल यांच्या विधानाचे ट्विट एका मासिकाने केले होते. यामध्ये पॉल यांनी वाहन उद्योगाला पुन्हा गती देण्यासाठी जीएसटीचे प्रमाण करण्याची गरज व्यक्त केली होती. हे क्षेत्र रोजगार देण्यात देशात तिसऱ्या क्रमांकावर असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले होते. त्यावर महिंद्रा यांनी ट्विटमधून प्रतिक्रिया देत वाहन उद्योगाच्या सद्यस्थितीवर प्रकाश टाकला आहे.
काय म्हटले आहे महिंद्रा यांना ट्विटमध्ये-
गेल्या १८ वर्षात व्यापारी वाहनांच्या विक्रीत सर्वात अधिक घसरण झाल्याचे महिंद्रा यांनी ट्विट केले आहे. हे विक्रीचे प्रमाण २० टक्क्यांनी घटल्याचे त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. आपण आर्थिक मंथन करण्यासाठी मंदार पर्वताचा शोध घेत आहोत. वाहन उद्योग हा एक मंदार पर्वत आहे. त्याचा छोट्या कंपन्या आणि रोजगारावर विविध प्रकारे मोठा प्रभाव असल्याचे त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.
काही दिवसांपूर्वीच सोसायटी ऑफ ऑटोमाबाईल इंडस्ट्रीने (एसआयएएम) सर्व वाहनांवरील जीएसटी २८ टक्क्यावरून १८ टक्के करण्याची मागणी केली आहे. याबाबत ५ जुलैला सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पात निर्णय घ्यावा, अशी एसआयएएमने मागणी केली होती. सर्व वाहनांच्या विक्रीत मे २०१८ मध्ये ८.६२ टक्क्यांची घट झाली आहे.