नवी दिल्ली - टाळेबंदीत प्रवाशांची विमान तिकिट दरात लूट होवू नये, म्हणून सरकारने कंपन्यांना नियम लागू केले आहेत. मात्र, हे नियम 24 ऑगस्टनंतर बदलू शकतात, असे नागरी विमान वाहतूक मंत्रालयाचे सचिव पी. एस. खरोला यांनी सांगितले. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.
नागरी विमान वाहतूक मंत्रालयाचे सचिव म्हणाले, की परिस्थिती कशी बदलते, त्यावर 24 ऑगस्टनंतर विमान तिकिटांचे दर बदलू शकतात. आंतरराष्ट्रीय विमान सेवा यापुढेही स्थगित राहणार आहे. असे असले तरी सरकारने 6 मेपासून वंदे भारत मिशन पुन्हा सुरू केली आहे. या मोहिमेमधून विदेशात अडकलेल्या भारतीयांना परत मायदेशी आणण्यात येणार आहे. केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री हरदीप सिंग म्हणाले, की टाळेबंदीच्या तिसऱ्या व चौथ्या टप्प्यात 750 आंतरराष्ट्रीय विमान उड्डाणांसाठी खासगी विमान कंपन्यांना परवानगी दिली होती.
केंद्र सरकारने गेली दोन महिने बंद असलेली देशांतर्गत विमान सेवा 25 पासून सुरू केली आहे. मात्र, टाळेबंदीत विमान तिकिटाचे दर नियंत्रणात ठेण्यासाठी सरकारने तिकिटांच्या किमतीवर मर्यादा घालून दिली आहे. यामध्ये तिकिटांचा दर विमान प्रवासासाठी लागणाऱ्या वेळेप्रमाणे कंपन्यांना लागू करावा लागतो. सामान्यत: कंपन्यांकडून मागणीप्रमाणे तिकिटांचे दर निश्चित करण्यात येतात.