पन्ना – अत्यंत उष्णतेत खाणीत काम करणाऱ्या आनंदीलाल कुशवाह या कामगाराच्या मेहनतीला अखेर फळ आले आहे. मध्यप्रदेशमधील पन्ना जिल्ह्यातील कुशवाह यांना 10.69 कॅरटचा हिरा खाणीत सापडला आहे. विशेष म्हणजे त्यांना जुलैपासून दुसऱ्यांदा खाणीत हिरा सापडला आहे. कुशवाह यांना सापडलेल्या हिऱ्याची किंमत किमान 50 ते 80 लाख रुपये, असल्याचा अंदाज आहे.
टाळेबंदीत हिऱ्याचा लहान तुकडाही सापडला तरी विशेष बाब आहे, असे स्थानिक अधिकारी सांगतात. अधिक हिरे सापडले तरी मागणीची पूर्तता होईल, असा अधिकारी विश्वास व्यक्त करत आहेत. खाण कामगाराला सापडलेला हिरा हा स्थानिक हिरा कार्यालयात जमा करण्यात येणार आहे. या हिऱ्याचा लिलाव सरकारकडून करण्यात येणार आहे. हिरा शोधून काढणाऱ्या व्यक्तीला लिलावात सहभागी होता येते. तसेच सरकारकडून रॉयल्टी आणि करात सवलत मिळते.
कामगार कुशवाह म्हणाले, की ही माझ्यासाठी मोठी कामगिरी आहे. मी आणखी प्रयत्न सुरू ठेवणार आहे. हिऱ्याचे मोठे तुकडे सापडतील, अशी आशा आहे. एवढा मोठा हिरा सापडण्यासाठी माझ्या सहकाऱ्यांचेही योगदान आहे. यापूर्वी सापडलेला हिरा सरकारी कार्यालयात जमा करण्यात आला आहे.
पन्ना हिऱ्याच्या खाणींसाठी प्रसिद्ध
पन्ना भागातील हिऱ्याची खाणक्षेत्र हे वनविभागाच्या अधिकारक्षेत्रात येते. राणीपुरा भागात 5 ते 10 फूट जमिनीच्या खोलीवर हिरे सापडतात असे मानण्यात येते. या जिल्ह्यात सुमारे 12 लाख कॅरेटचे हिऱ्याचे साठे असावेत, असा अंदाज आहे. बहुतेक खाणी या सरकारी कंपनी एनएमडीसीच्या मालकीच्या आहेत. तर मध्यप्रदेश सरकारने काही लहान प्लॉट हे हिरे शोधण्यासाठी भाड्याने दिले आहेत.