नवी दिल्ली - 'जागतिक जैवइंधन दिन' १० ऑगस्टला जगभरात साजरा केला जातो. यामागे पारंपरिक इंधनाला पर्याय असलेल्या जैवइंधनाचा वापर वाढावा आणि त्याचे महत्त्व कळावे हा हेतू आहे.
देशामध्ये पेट्रोलियम आणि नैसर्गक वायू (नॅचरल गॅस) मंत्रालयाकडून २०१५ पासून जागतिक जैवइंधन दिन साजरा करण्यात येतो.
काय आहे 'जैवइंधन दिना'मागील रंजक इतिहास-
सर रुडाल्फ डिझेल (डिझेल इंजिनाचे संधोधक) यांनी पहिले शेंगदाण्याच्या तेलावर चालणारे मॅकनिकल इंजिन १८९३ ला आजच्याच दिवशी म्हणजे १० ऑगस्टला यशस्वीपणे चालविले. त्यांनी संशोधनातून दाखवून दिले की, भविष्यातील शतकात कच्च्या तेलाला वनस्पती तेल हे पर्याय असणार आहेत. त्यांच्या अनन्यसाधारण कामगिरीमुळे हा दिवस जागतिक जैवइंधन दिवस म्हणून साजरा केला जातो.
उर्जेसाठी देशाच्या तिजोरीवर पडतो मोठा भार-
भारत हा जगातील सर्वात अधिक उर्जेचा उपभोक्ता ग्राहक आहे. त्यामुळे सीएनजी, जैविक इंधन, इलेक्ट्रिक वाहन अशा संमिश्र इंधनाची गरज असल्याचे मत पेट्रोलिय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी व्यक्त केले होते. देशात २११.६ दशलक्ष टन पेट्रोलिअम उत्पादनाचा वापर २०१८-१९ मध्ये करण्यात आला होता. मोठ्या प्रमाणात पेट्रोल आणि डिझेल हे वाहनांमध्ये वापरण्यात येते. भारताची उर्जेची गरज दरवर्षी ४.२ टक्के २०३५ पर्यंत वाढणार आहे. सध्या भारत तेलइंधनाच्या गरजेकरता ८३ टक्के आयातीवर अवलंबून आहे. आर्थिक वर्ष २०१८-१९ मध्ये भारताने तेलइंधनावर ७.८३ लाख कोटी खर्च केले आहेत.
इथेनॉलसारखे जैवइंधन पेट्रोल-डिझेलला आहे चांगला पर्याय-
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी विविध प्रकारच्या पर्यावरणस्नेही इंधनावर लक्ष केंद्रित करत असल्याचे म्हटले होते. इथेनॉल इंधनाला देशात भरपूर संधी आहे. गेल्या वर्षी इथेनॉलवर आर्थिक व्यवस्था ही ११ हजार कोटीपर्यंत झाली होती. हा शाश्वत व्यवसाय आहे. त्यामुळे एकट्या उत्तर प्रदेशमध्ये २०० साखर कारखाने सुरू राहणे शक्य असल्याचे त्यांनी म्हटले होते.
टीव्ही मोटर कंपनीने इथेनॉलच्या वापरावर चालणारी टीव्हीएस अॅपाचे आरटीआर २०० फाय ई १०० लाँच केली आहे.
मात्र, सध्या देशात इथेनॉल पंप नाहीत.
हे आहेत इथेनॉलचे फायदे-
इथेनॉल हे जैविक विघटन होणारे, हाताळणे-जतन करणे-वाहतूक करणे यासाठी सुरक्षित इंधन आहे. त्यामध्ये ३५ टक्के ऑक्सिजन असतो. त्याच्या वापराने नायट्रोजन ऑक्साईडचे प्रमाण कमी होते. तसेच कार्बन मोनोक्साईड विशेषत: हवेतील सल्फर डायॉक्साईडचे प्रमाण कमी होते. इथेनॉल हे साखरेचे घटक असलेल्या ऊस, बीट, मका अशा घटकापासून तयार होते.
बायोडिझेल - अखाद्य वनस्पती तेलापासून मिथील हे फॅटी अॅसिड तयार होते. जट्रोफा या वनस्पतीपासून तसचे प्राण्यांच्या चरबीपासूनही बायोडिझेलचे उत्पादन होते.
जैवइंधनाबाबत सरकारने तयार केले आहे राष्ट्रीय धोरण
- केंद्र सरकारने जून २०१८ मध्ये जैवइंधन राष्ट्रीय धोरण २०१८ मध्ये मंजूर केले आहे.
- जैवइंधनाचे राष्ट्रीय धोरण करण्यामागे २० टक्के इथेनॉल आणि ५ टक्के जैविक डिझेलचा २०३० पर्यंत वापर करणे हा हेतू आहे.
- तसेच जैवइंधनाचे उत्पादन वाढविणे त्यासाठी प्रोत्साहन देणे हा धोरणाचा उद्देश आहे. सरकारने जैवइंधनाचे प्रमाण वाढविण्यासाठी घेतलेल्या धोरणाचा परिपाक म्हणून काही सकारात्मक बदल झाल्याचे दिसत आहे. इथेनॉलचा २०१३-१४ मध्ये ३८ कोटी लिटर वापर करण्यात आला होता. तर २०१७-१८ मध्ये १४१ कोटी लिटर इथेनॉलचा वापर झाला आहे.
- केंद्र सरकारने इथेनॉलवरील जीएसटी हा १८ टक्क्यावरून ५ टक्के केला आहे.
- ऊसापासून तयार करण्यात आलेल्या इथेनॉलची किंमत प्रथमच निश्चित करण्यात आली आहे. त्याची किंमत ४७.४० रुपये लिटर करण्यात आली आहे.
केंद्र सरकार जैवइंधनाचा कार्यक्रम हा 'मेक इन इंडिया' आणि 'स्वच्छ भारत मोहिमे'शी जोडत आहे. कच्च्या तेलावरील अवंलबून असण्याचे प्रमाण कमी करणे, स्वच्छ उर्जा, शेतकऱ्यांना अतिरिक्त उत्पन्न आणि ग्रामीण भागात रोजगार निर्मिती हे जैवइंधनाचे फायदे आहेत.