मुंबई - सरकारी कंपनी एअर इंडिया बंद होणार नसल्याचे पत्र कंपनीचे संचालक मीनाक्षी मल्लिक यांनी सर्व प्रवास भागीदार कंपन्यांना लिहिले आहे. फ्लिपकार्टवरून २ हजार रुपयापर्यंतची खरेदी करताना ओटीपीपासून सुटका करणारे अॅप कंपनीने लाँच केले आहे. अशा विविध व्यापार बातम्यांचा संक्षिप्त आढावा, जाणून घ्या.
व्हिसाकार्ड असलेल्या ग्राहकांकरिता फ्लिपकार्टने हा केला बदल
- मुंबई - फ्लिपकार्टने व्हिसा कार्ड असलेल्या ग्राहकांकरिता व्हिसा सेफ क्लिक (व्हीएससी) ही सुविधा लाँच केली. या सुविधेमुळे ग्राहकांना २ हजार रुपयापर्यंतची खरेदी करताना ओटीपी लागणार नाही. त्यासाठी ग्राहकांना व्हीएससीचे अॅप वापरावे लागणार आहे. हे अॅप सुरक्षित असल्याचे फ्लिपकार्टने म्हटले आहे.
एअर इंडिया बंद होणार असल्याच्या वावड्या, कंपनीच्या संचालकांनी केला खुलासा
- नवी दिल्ली - सरकारी कंपनी एअर इंडिया बंद होणार नसल्याचे पत्र कंपनीचे संचालक मीनाक्षी मल्लिक यांनी सर्व प्रवास भागीदार कंपन्यांना लिहिले आहे. कंपनी बंद होणार असल्याची निराधार अफवा असल्याचे त्यांनी पत्रात नमूद केले आहे.
सुझूकी मोटारसायकल इंडियाने लाँच केली बीएस-६ इंजिनक्षमतेची स्कूटर
- नवी दिल्ली - सुझुकी मोटरसायकल इंडियाने (एसएमआयपीएल) बीएश-६ इंजिनक्षमता असलेली पहिली १२५ स्कूटर लाँच केली. या स्कूटरची किंमत ६४,८०० रुपये ते ६९,५०० रुपये (एक्स शोरुम दिल्ली) आहे.
भारतीय सेवा क्षेत्राची पाच महिन्यातील सर्वात चांगली कामगिरी; पीएमआय सर्व्हे
- नवी दिल्ली - भारतीय सेवा क्षेत्राने डिसेंबरमध्ये त्यापूर्वीच्या पाच महिन्यांच्या तुलनेत चांगली कामगिरी केली आहे. कामांचे नव्ा ऑर्डरने रोजगार वाढल्याचे आयएच मर्किट इंडिया सर्व्हिस बिझनेस अॅक्टिव्हिटी इंडेक्समध्ये दिसून आले. नोव्हेंबरमध्ये सेवा क्षेत्रातील चलनवलन (अॅक्टिव्हिटी) निर्देशांक ही ५२.७ टक्के होती. तर डिसेंबरमध्ये सेवा क्षेत्रातील चलनवलन निर्देशांक हा ५३.३ टक्के होता.
मुंबई शेअर बाजारासह निफ्टीला गेल्या सहा महिन्यात सर्वाधिक फटका
- मुंबई - मुंबई शेअर बाजार निर्देशांक आज ७८७.९८ अंशाने घसरून ४०,६७६.६३ वर स्थिरावला. तर निफ्टीचा निर्देशांक २३३.६० अंशाने घसरून ११,९९३.०५ वर स्थिरावला. ही दोन्ही भांडवली बाजाराची गेल्या सहा महिन्यातील सर्वात मोठी घसरण आहे. इराण-अमेरिकेतील तणाव वाढल्याने देशातील भांडवली बाजाराला फटका बसला आहे.
इराण-अमेरिकेतील तणावाचा परिणाम, कच्च्या तेलाच्या किमतीचा उच्चांक
- प्रोव्हिडन्स - जागतिक कच्च्या तेलाचा निर्देशांक हा वधारूनन प्रति बॅरलची किंमत ७० डॉलरहून अधिक झाली आहे. गेल्या तीन महिन्यांत प्रथमच बॅरलची एवढी किंमत झाली आहे. इराण-अमेरिकेतील तणावामुळे ही परिस्थिती उद्भवली आहे. सौदी अरेबियामधील तेलशुद्धीकरण प्रकल्पावर सप्टेंबरमध्ये हल्ला झाल्यानंतर कच्च्या तेलाच्या बॅरलची किंमत ७० डॉलरहून अधिक झाली होती.
हेही वाचा-शेअर बाजार ७८८ अंशाने कोसळला; अमेरिका-इराणमधील तणावाचा परिणाम