नवी दिल्ली - केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सार्वजनिक बँकांच्या व्यवस्थापकीय संचालकांची आढावा बैठक घेतली. एमएसएमईसह इतर उद्योगांना कर्ज देण्यासाठी त्यांच्यापर्यंत बँकांनी पोहोचावे, असे निर्देश अर्थमंत्र्यांनी बैठकीत दिले.
एमएसएमई उद्योगांना आपत्कालीन कर्ज हमी योजनेतून (ईसीएलजीएस) कर्ज द्यावे, अशा सूचना केंद्रीय अर्थमंत्र्यांनी बँकांच्या प्रमुख अधिकाऱ्यांना केल्या आहेत. तसेच उद्योगांना लागणाऱ्या कर्जासाठी प्रयत्न करावे, असे निर्देश सीतारामन यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगमधून दिले आहेत.
वित्तीय सेवा विभागाने या बैठकीची माहिती ट्विट करून दिली आहे. फिक्कीच्या राष्ट्रीय कार्यकारी समितीच्या सदस्यांची सीतारामन यांनी सोमवारी बैठक घेतली होती. या बैठकीत अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आत्मनिर्भर पॅकेज हे केवळ एमएसएमई उद्योगांसाठी नसून सर्व कंपन्याकरता असल्याचे सांगितले होते.
ईसीएलजीएस या योजनेसाठी फॉर्म सोपे आणि औपचारिकता कमी ठेवावी, असा निर्मला सीतारामन यांनी बँकांना सल्ला दिला आहे.
दरम्यान, टाळेबंदी आणि कोरोनाच्या संकटात उद्योगांना दिलासा देण्यासाठी आत्मनिर्भर योजना जाहीर करण्यात आली आहे.