बागलकोट - कोरोना या विषाणूजन्य रोगाने चीनसह जगभरातील व्यापारावर परिणाम होत आहे. कर्नाटकमधील हुंगुंड तालुक्यातील ओवा उत्पादक शेतकऱ्यांना याचा मोठा आर्थिक फटका बसत आहे.
हुंगुंड तालुक्यातील शेतकऱ्यांनी हजारो हेक्टर जमिनीवर ओव्याची लागवड केली होती. दरवर्षीप्रमाणे ओव्याची चीनला निर्यात होईल, अशी त्यांना अपेक्षा होती. मात्र, चीनमधील कोरोनामुळे त्यांच्या अपेक्षांवर पाणी फिरले आहे. गोडावूनमधील ओवा सडत आहे. तर एकट्या धन्नुर गावात सुमारे १० क्विटंल ओवा हा विक्रीविना पडून आहे. आंध्रप्रदेशमधील कर्नुलच्या बाजारामधून ओवा हा चीनला निर्यात होत असतो. गतवर्षी ओव्याला प्रति टन ३०,००० रुपये भाव मिळाला होता. सध्या, ओव्याचे भाव घसरून प्रति टन ५ हजार रुपये झाले आहेत.
हेही वाचा-चिंताजनक! केंद्र सरकारने मिळविलेल्या महसुलापैकी ८४.१ टक्के जानेवारीपर्यंत खर्च
चिनी कंपन्यांकडून ओव्याचा उपयोग वेदनाशामक मलम तयार करण्याठी होतो. ओव्याची खरेदी करण्यासाठी कोणीही इच्छुक नसल्याचे दलालांनी शेतकऱ्यांना सांगितले. विजयवाडा जिल्ह्यातील बसवण्णा बागेवाडी तालुक्यातही ओवा उत्पादक शेतकऱ्यांनाही फटका बसला आहे. ओव्याला स्थानिक बाजारपेठेत फारशी मागणी नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी मालाची कुठे विक्री करायची असा प्रश्न आहे. केवळ चीनमध्ये निर्यात करण्यासाठी कर्नाटकमधील शेतकरी ओव्यांचे उत्पादन घेतात.