नवी दिल्ली - किरकोळ बाजारपेठेतील महागाई जुलैमध्ये कमी झाली आहे. हे प्रमाण ३.१५ टक्के एवढे झाले आहे. कच्च्या तेलाच्या कमी झालेल्या किमती आणि कमी झालेले अन्नधान्याचे दर यामुळे हा परिणाम झाल्याचे सरकारच्या आकडेवारीतून दिसून आले आहे.
जूनमध्ये ग्राहक किंमत निर्देशांकावर आधारित असलेल्या किरकोळ बाजारपेठेमधील महागाई ३.१८ टक्के एवढी महागाई होती. तर गतवर्षी जुलैमध्ये ४.१७ टक्के एवढी किरकोळ बाजारपेठेत महागाई होती. अन्नधान्य महागाई किंमत ही ग्राहक अन्नधान्य किंमत निर्देशांकावर (सीएफपीआय) आधारित असते. ही महागाई जून २०१९ मध्ये २.२५ टक्के असताना जुलैमध्ये वाढून २.३६ टक्के झाली आहे. ही आकडेवारी केंद्रीय सांख्यिकी कार्यालयाने प्रसिद्ध केली आहे.
भाजीपाल्याचे दर कमी, मात्र अन्नधान्याच्या किमतीवर लक्ष ठेवण्याची गरज-
भाजीपाल्याचे दर हे जुलैमध्ये २.८२ टक्क्यांनी कमी झाले आहेत. जूनमध्ये भाजीपाल्याचे दर हे ४.६६ टक्के एवढे होते. डाळी आणि उत्पादने यांच्या किमती जूनमध्ये ५.६८ टक्के होत्या. तर जुलैमध्ये ६.८२ टक्के महागाईचे प्रमाण होते. फळांच्या किमती जुलैमध्ये वाढल्या आहेत. प्रोटीन असलेले मांस आणि मासे यांच्या किमती जून व जुलैमध्ये ९.०५ टक्क्यावर स्थिर राहिल्या आहेत. अन्नधान्याच्या किमतीवर लक्ष ठेवण्याची गरज असल्याचे इक्राचे मुख्य अर्थतज्ज्ञ आदिती नायर यांनी म्हटले आहे. कारण काही राज्यात पूरस्थिती आहे.
किरकोळ बाजारपेठेतील महागाईचा आरबीआय पतधोरणावर पडतो प्रभाव-
सध्या किरकोळ बाजारपेठेतील महागाई ही आरबीआयने निश्चित केलेल्या पातळीहून कमी आहे. केंद्र सरकारने आरबीआयला महागाई ही ४ टक्क्यापर्यंत मर्यादित ठेवण्याचे आदेश दिले आहेत. आरबीआयकडून तिमाही पतधोरण जाहीर करताना किरकोळ बाजारपेठेतील महागाईचा विचार करण्यात येतो.