नवी दिल्ली - देशात कोरोनाविरोधात लढण्यासाठी लशींची पुरेशी निर्मिती होत नसताना दिलासादायक बातमी आहे. जॉन्सन अँड जॉन्सनची एकवेळचा डोस असलेली लस भारतात लवकरच येणार आहे. त्यापूर्वी कंपनीने भारतीय औषधी महानियंत्रकांकडे (आयडीजी) तिसऱ्या टप्प्यातील चाचणी घेण्यासाठी परवानगी मागितली आहे. तसेच लस आयात करण्यासाठीही परवाना मागितली आहे.
केंद्रीय औषधी मानांकन संस्थेत (सीडीएससीओ) कोरोनाविरोधातील लशीच्या परवान्यासाठी कोरोनाविषयीची खास तज्ज्ञ समिती आहे. या समितीबरोबर बैठक व्हावी, असे जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीने म्हटले आहे. केंद्र सरकारने आठवडाभरापूर्वीच अमेरिका, युरोप, इंग्लंड, जपान आणि जागतिक आरोग्य संघटनेने परवाना दिलेल्या कोरोना लशींना आपत्कालीन मंजुरी दिली आहे. जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीला तांत्रिक कारणाने आज दुसऱ्यांदा भारतीय औषधी महानियंत्रकांकडे चाचणी घेण्यासाठी अर्ज करावा लागला आहे.
हेही वाचा-लॉजमधील हाय-प्रोफाईल वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश, ८ तरुणींसह १० जणांना अटक
१ मेपासून १८ वर्षांवरील सर्व पात्र व्यक्तींना कोरोना प्रतिबंधात्मक लस
केंद्र सरकारने लसीकरणाबाबत मोठा निर्णय घेतला आहे. १ मेपासून १८ वर्षांवरील सर्व पात्र व्यक्तींना कोरोना प्रतिबंधात्मक लस दिली जाणार आहे. यापूर्वी पहिल्या टप्प्यात १६ जानेवारीपासून ६० वर्षांवरील ज्येष्ठांना लस दिली जात होती. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात १ एप्रिलपासून ४५ वर्षांवरील सर्वांना लसीकरणास सुरूवात झाली. आता १ मेपासून लसीकरणाचा तिसरा टप्पा सुरू होणार आहे.
हेही वाचा-१८ वर्षांवरील सर्वांना मिळणार लस; मुख्यमंत्री ठाकरेंनी मानले केंद्राचे आभार
देशात दोन कंपन्यांच्या लशींना परवानगी-
तातडीच्या वापरासाठी ऑक्सफर्ड-अॅस्त्राझेनेकाच्या 'कोविशिल्ड' आणि भारत बायोटेक कंपनीच्या 'कोव्हॅक्सिन' लसीला औषध महानियंत्रक कार्यालयाने जानेवारी २०२१ मध्ये परवानगी दिली आहे. कोरोनावरील तज्ज्ञ समितीने या दोन लसींची शिफारस डीसीजीआयकडे केली होती.