बंगळुरू - इन्फोसिसच्या अंतर्गत लेखापरीक्षण समितीला कोणतीही वित्तीय अनियमितता आढळून आली नसल्याचे कंपनीने म्हटले आहे. कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सलील पारिख आणि मुख्य वित्तीय अधिकारी निलांजन रॉय यांनी कोणताही गैरव्यवहार केला नसल्याचेही कंपनीने स्पष्ट केले. कंपनीमधील काही जागल्यांनी कंपनीमध्ये गैरव्यवहार झाल्याचे आरोप केले होते.
इन्फोसिसचे अध्यक्ष नंदन नीलकेणी यांनी कंपनीच्या अंतर्गत लेखापरीक्षणाची शेअर बाजाराला माहिती दिली आहे. कंपनीने काळजीपूर्वक तपास केल्यानंतर लेखापरीक्षण समितीला कोणतेही गैरकृत्य झाल्याचे आढळून आले नाही, असे नीलकेणी यांनी शेअर बाजाराला दिलेल्या माहितीत म्हटले. गैरव्यवहाराचे करण्यात आलेले दावे हे कोणत्याही गुणवत्तेवर आधारित नव्हते, असेही नीलकेणी यांनी म्हटले.
हेही वाचा-'खनिज तेलाच्या वाढत्या किमतीबाबत चिंता करण्याची गरज नाही'
कायदेशीर सल्लागार शार्दूल अमरचंद मंगलदास आणि कंपनी प्राईसवॉटरहाऊसकूपर्सने कंपनीमधील जागल्यांच्या दाव्यांची चौकशी केली. तपास पथकाने एकूण १२८ मुलाखती घेतल्या आहेत. त्यामध्ये ज्यांच्यावर आरोप करण्यात आला, अशा अधिकाऱ्यांचा समावेश होता. कंपनीने इलेक्ट्रॉनिक स्वरुपामधील २ लाख १० हजार कागदपत्रे आणि छायाचित्रे तपासली आहेत. हा सुमारे ८ टेट्राबाईट एवढा डाटा होता. यामध्ये १ जानेवारी, २०१८ ते ३० सप्टेंबर २०१९ दरम्यानच्या माहितीचा समावेश होता.
हेही वाचा-सोन्याच्या तस्करीत वाढ; 'हे' आहे कारण
नीलकेणी यांच्या माहितीनुसार कंपनीने तपास पथकाला कोणतीही माहिती घेण्यासाठी मर्यादा व बंधन घालून दिले नव्हते. तपास पथकाला इन्फोसिसचे संचालक आणि कर्मचाऱ्यांनी पूर्ण सहकार्य केल्याचे त्यांनी सांगितले. इन्फोसिसने अंतर्गत लेखापरीक्षणासाठी एर्नेस्ट अँड यंग कंपनीचा सल्ला घेतला होता.