नवी दिल्ली – कोरोनाच्या संकटात इंडिगो विमान कंपनीला मोठा आर्थिक फटका बसला आहे. इंडिला पहिल्या तिमाहीत 2 हजार 844.3 कोटींचा निव्वळ तोटा झाला आहे. तर गतवर्षी पहिल्या तिमाहीत इंडिगोला 1 हजार 203 कोटी रुपयांचा नफा झाला होता.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर असलेल्या टाळेबंदीमुळे 24 मे 2020 पर्यंत कमी क्षमतेने विमान सेवा सुरू होती. त्याचा परिणाम पहिल्या तिमाहीच्या आर्थिक कामगिरीवर झाल्याचे इंडिगोने शेअर बाजाराला दिलेल्या माहितीत म्हटले आहे. गतवर्षीच्या तुलनेत इंडिगोच्या महसुली उत्पन्नात 91.9 टक्के घसरण झाली आहे. इंडिगोला पहिल्या तिमाही 766.7 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे.
इंडिगोचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोनोजॉय दत्ता म्हणाले, की विमान वाहतूक क्षेत्र हे संकटात तग धरून राहण्यासाठी प्रयत्न करत आहे. कंपनीकडे 18 हजार 449.8 कोटी रुपये शिल्लक आहेत. असे असले तरी उत्पादनामध्ये सुधारणा, ग्राहकांना प्राधान्य व खर्च यावर मर्यादा आल्या आहेत. पहिल्या तिमाहीत इंडिगोच्या विमानांची रोज 418 उड्डाणे झाली आहेत. दरम्यान, केंद्र सरकारने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 23 मार्चपासून आंतरराष्ट्रीय विमान वाहतूक सेवा स्थगित केली आहे. तर 25 मेपासून देशात ठराविक मार्गांवर विमान वाहतूक सेवा सुरू केली आहे.