नवी दिल्ली - चीनने देशातील कंपन्यांमध्ये मोठी गुंतवणूक केल्याचे स्पष्ट झाले आहे. मागील चार आर्थिक वर्षांमध्ये चीनने देशातील १ हजार ६००हून अधिक कंपन्यांमध्ये थेट विदेशी गुंतवणूक (एफडीआय) केल्याची माहिती केंद्रीय अर्थ राज्यमंत्र्यांनी राज्यसभेत दिली. या देशातील कंपन्यांमध्ये चीनच्या कंपन्यांना १ अब्ज डॉलरची गुंतवणूक केली आहे.
देशातील कंपन्यांमध्ये विशेषत: स्टार्टअपमध्ये चीनच्या कंपन्यांनी किती गुंतवणूक केली, असा प्रश्न विरोधकांनी सरकारला विचारला होता. त्यावर केंद्रीय राज्य अर्थमंत्री अनुरागसिंह ठाकूर यांनी लेखी उत्तरातून राज्यसभेत माहिती दिली. चीनी कंपन्यांनी देशातील कंपन्या व स्टार्टअपमध्ये १.०२ अब्ज डॉलरची गुंतवणूक केली आहे. ही गुंतवणूक ४६ क्षेत्रातील कंपन्यांमध्ये करण्यात आली आहे. यामध्ये वाहन उद्योग, पुस्तकांची छपाई (लिथो प्रिटिंग इंडस्ट्रीज), इलेक्ट्रॉनिक्स, सेवा आणि इलेक्ट्रिकल इक्विपमेंट आदी क्षेत्रातील कंपन्यांचा समावेश आहे.
हेही वाचा-टिकटॉकला पर्याय ठरू शकणारे यूट्यूबचे 'शॉर्टस' भारतात लाँच
सर्वात अधिक वाहन उद्योगात १७२ दशलक्ष डॉलरची थेट विदेशी गुंतवणूक करण्यात आली आहे. तर सेवा क्षेत्रात चीनी कंपन्यांनी १३९.६५ दशलक्ष डॉलरची गुंतवणूक करण्यात आली आहे. केंद्रीय कंपनी व्यवहार राज्यमंत्री अनुराग ठाकूर यांनी लेखी उत्तरात सांगितले, की कंपनी व्यवहार मंत्रालयाकडे चीनच्या संस्थांकडून गुंतवणूक झालेल्या गुंतवणुकीची माहिती नाही. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाकडे एफडीआय डाटा ठेवण्यात येतो. तसेच एफडीआयमधून शेअरमध्ये केलेल्या गुंतवणुकीची माहिती वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाकडे ठेवण्यात येते.
हेही वाचा- चालू आर्थिक वर्षात देशाच्या विकासदरात ८ टक्क्यांच्या घसरणीचा एडीबीचा अंदाज
चीनच्या कंपन्यांनी एप्रिल २०१६ ते मार्च २०२०दरम्यान देशामध्ये केलेल्या गुंतवणुकीची माहिती अनुरागसिंह ठाकूर यांनी राज्यसभेत दिली. दरम्यान, चीन आणि भारतामध्ये पूर्व लडाखमध्ये प्रत्यक्ष ताबा रेषेवरून तणावाची स्थिती आहे.