इस्लामाबाद - पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानचा मोस्ट फेव्हर्ड नेशन हा दर्जा भारताने काढून घेतला आहे. याबाबतची घोषणा केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर शुक्रवारी केली. तरीही भारताने आम्हाला कळविले नाही, असा पाकिस्तानने कांगावा केला आहे.
पाकिस्तानच्या पंतप्रधानांचे सल्लागार अब्दुल रझाक दाऊद म्हणाले, की भारताने मोस्ट फेव्हर्ड नेशन हा दर्जा काढून घेतल्याबाबत आम्ही विचार करत आहोत. या विषयाबाबत आम्ही भारताशी बोलणार आहोत. याबाबतचे वृत्त पाकिस्तानच्या माध्यमाने दिले आहे. जागतिक व्यापार संघटनेसारख्या विविध फोरममध्ये हा विषय पाकिस्तान उपस्थित करेल, असेही ते म्हणाले.
केंद्र सरकारने पाकिस्तानमधून आयात होणाऱया वस्तुवर २०० टक्के आयात शुल्क लागू केले आहे. मोस्ट फेव्हर्ड नेशनच्या दर्जामुळे पाकिस्तानला भारताबरोबरील व्यापारात आजवर झुकते माप मिळत होते.
काय आहे मोस्ट फेव्हर्ड नेशनचा दर्जा -
जागतिक व्यापार संघटनेच्या (डब्ल्यूटीओ) नियमाप्रमाणे एमएफएनचा भारताने पाकिस्तानला दर्जा दिला होता. या दर्जाप्रमाणे संबंधित देशाशी व्यापार करताना कोणताही भेदभाव करता येत नाही. याचाच अर्थ कोणत्याही देशासाठी जास्त अथवा कमी कर लागू करून विशिष्ट वागणूक देता येत नाही.
![undefined](https://s3.amazonaws.com/saranyu-test/etv-bharath-assests/images/ad.png)