नवी दिल्ली - ग्रामीण भागात राहणाऱ्या अनेकांना एटीएम केंद्रासाठी दूरवर राहावे लागते. मात्र अशा स्थितीतही गेल्या दोन वर्षात एटीएमची संख्या ५९७ ने कमी झाली आहे. ही आकडेवारी बँकांची बँक म्हणून काम करणाऱ्या भारतीय रिझर्व्ह बँकेने प्रसिद्ध केली आहे.
देशात २०१७ मध्ये २ लाख २२ हजार ३०० एटीएमची संख्या होती. सध्या देशात त्याहून कमी म्हणजे २ लाख २१ हजार ७०३ एटीएम आहेत. बाजारातील चलनाच्या तुलनेत एटीएममधून रक्कम काढण्याचे प्रमाण भारतामध्ये खूप कमी आहे. ही बाब बेचमार्क इंडियाज पेमेंट सिस्टिम अहवालामधून समोर आली आहे. तसेच रोख रक्कम काढणे, त्यातून व्यवहार करणे आणि बँकेत मुदत ठेवी ठेवण्याचे प्रमाण कमी आहे.
एटीएमच्या संख्येत चीननंतर भारताचा क्रमांक लागतो. मात्र चीनमध्ये एटीएमची संख्या २०१२ ते २०१७ दरम्यान १४ टक्क्यांनी वाढली आहे. एटीएमची संख्या वाढविण्यात देशाने प्रगती केली आहे. मात्र लोकसंख्येच्या प्रमाणात एटीएमचे प्रमाण कमी असल्याचे अहवालात म्हटले आहे. या अहवालात देशातील पेमेंट व्यवस्थेची इतर देशातील पेमेंट व्यवस्थेशी तुलना करण्यात आली आहे.