वॉशिंग्टन - चीनबरोबर व्यापारी युद्ध सुरू असताना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दोन्ही देशावर एकाचवेळी निशाणा साधला आहे. भारत व चीन हे विकसनशील राहिले नाहीत, असे त्यांनी विधान केले आहे. ते पेन्निसिल्व्हॅनियामध्ये बोलत होते. जागतिक व्यापार संघटनेमधून त्यांना फायदा आणखी घेवू देणार नाही, असेही ट्रम्प म्हणाले.
ट्रम्प म्हणाले, चीन आणि भारत हे आशियामधील बलाढ्य देश आता विकसनशील देश राहिले नाहीत. ते डब्ल्यूटीओचा फायदा घेवू शकत नाहीत. मात्र ते विकसनशील देशाच्या नावाखाली डब्ल्यूट्यूओचा फायदा घेत आहेत. त्यामुळे अमेरिकेचा तोटा होत आहे. हे अनेक वर्षापासून सुरू आहे. डब्ल्यूटीओ ही अमेरिकेला योग्य वागणूक देईल, असा विश्वास ट्रम्प यांनी व्यक्त केला.
काय आहे डब्ल्यूटीओ -
जागतिक व्यापार संघटना (डब्ल्यूटीओ) ही विविध देशांमध्ये चालणाऱ्या व्यापाराचे नियमन करणारी संस्था आहे. या संघटनेकडून विकसनशील देशाांना विविध सवलती देण्यात येतात.
यामुळे डोनाल्ड ट्रम्प यांची व्यापाराबाबत आक्रमक भूमिका-
ट्रम्प हे 'अमेरिका फर्स्ट' हे धोरण राबवित आहेत. या धोरणाला अनुसरून त्यांनी व्यापारासाठी आक्रमक भूमिका घेतली आहे. भारताकडून अमेरिकेच्या उत्पादनावर जादा आयात शुल्क लावण्यात येत असल्याचा त्यांनी आरोप केला. तसेच भारत हा टॅरिफ किंग असल्याची त्यांनी जुलैमध्ये टीका केली होती. विकसनशील देशाचा दर्जा ठरविण्यासाठी काही निकष डब्ल्यूटीओने निश्चित करावेत, असे ट्रम्प जुलैमध्ये म्हणाले होते. ट्रम्प यांनी अमेरिका व्यापार प्रतिनिधीचे (यूएसटीआर) सक्षमीकरण केले आहे. डब्ल्यूटीओमधील कमतरतांमुळे एखादा विकसित देश गैरफायदा घेत असल्यास त्याविरोधात कारवाई करण्यास सुरुवात केली आहे.