कोलकाता – आयआयटी खरगपूर येथील संशोधकांच्या गटाला ‘गांधी युग तांत्रिक नवसंशोधन पुरस्कार 2020’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. या संशोधकांनी सूर्यप्रकाशात वाळलेल्या कपड्यांपासून वीजनिर्मिती करणारी यंत्रणा विकसित केली आहे.
आयआयटीच्या दुसऱ्या गटालाही उर्जेचे संवर्धन आणि परिधान करण्यात येणाऱ्या आणि इलेक्ट्रॉनिक्स साधनांमधील औष्णिक ऊर्जेचे व्यवस्थापनासाठी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
आयआयटी संचालक प्रा. विरेंद्र तिवारी म्हणाले, की स्वच्छ ऊर्जेसाठी काही क्षेत्रांमधून स्त्रोत अजून शिल्लक आहेत. या स्त्रोतामधून दुर्गम भागातही उर्जा मिळू शकते. रसायन अभियांत्रिकीच्या विभागाच्या गटाला आणि प्राध्यापक सुनांदो दासगुप्ता यांनाही पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. या गटाने तयार केलेल्या साधनाची दुर्गम भागात असलेल्या खेड्यात चाचणी करण्यात आली आहे. उन्हात वाळविण्यासाठी ठेवलेल्या कपड्यांमधून 50 व्हॅटची ऊर्जानिर्मिती करणे शक्य झाल्याचे चाचणीमधून दिसून आले आहे. हे कपडे वीजनिर्मितीसाठी सुपरकॅपिसटरला जोडण्यात आले होते.
सृष्टी आणि गिती या स्वयंसेवी संस्थांकडून 'गांधी युग तांत्रिक नवसंशोधनाचे' पुरस्कार देण्यात येतात. त्यामागे अभियांत्रिकीच्या सर्व शाखांमधील विद्यार्थ्यांमध्ये नवसंशोधनाला प्रोत्साहन देणे हा संस्थांचा उद्देश आहे.