नवी दिल्ली - होंडा मोटरसायकल आणि स्कूटर इंडिया (एचएमएसआय) कंपनीने ५० हजार ३४ वाहने परत घेण्याचा निर्णय घेतला आहे. वाहनांच्या पुढील ब्रेकच्या भागात दोष असल्याचे हा निर्णय घेण्यात आला आहे.
परत घेण्यामध्ये येणाऱ्या वाहनांत एव्हिटर (डिस्क), अॅक्टिव्हा १२५ (डिस्क), ग्रॅझिया (डिस्क) आणि सीबी शाईन (सेल्फ डिस्क) सीबीएस या मॉडेलचा समावेश आहे. होंडा कंपनी ४ फेब्रुवारी ते ३ जूलै २०१९ मध्ये तयार करण्यात आलेली वाहनेच परत घेणार आहे.
पुढील ब्रेक मास्टर सिलिंडिरमध्ये दोष असल्याची शक्यता आहे. या दोषामुळे पुढील चाक फिरण्यात अडथळा येण्याची शक्यता आहे. तसेच वाहनाचे चाक जाम होण्याची शक्यता आहे. पूर्वसावधगिरी म्हणून कंपनीने स्वत:हून हा निर्णय घेतला आहे. सदोष असणारा पार्ट बदलून देण्यात येणार असल्याचे होंडाने म्हटले आहे. कंपनीने शुक्रवारपासून वितरकांमार्फत ग्राहकांशी संपर्क साधण्यास सुरू केली आहे.