नवी दिल्ली – देशात खुली झालेली टाळेबंदी आणि महत्त्वाचे उद्योग पुन्हा सुरू झाल्याचा नोकरी भरतीवर सकारात्मक परिणाम झाला आहे. नोकर भरतीत जूनच्या तुलनेत जुलैमध्ये 5 टक्के सुधारणा झाल्याचे नौकरी डॉट कॉमने म्हटले आहे.
गतवर्षीच्या तुलनेत जुलैमध्ये नोकरी भरतीत अद्यापही 47 टक्क्यांची घसरण असल्याचे नौकरी जॉबस्पीक इंडेक्समध्ये म्हटले आहे. हॉटेल, विमान सेवा, प्रवास, किरकोळ विक्री, स्थावल मालमत्ता अशा उद्योगांना जूनप्रमाणेच जुलैमध्ये अडचणींना सामोरे जावे लागले आहे.
गतवर्षीच्या जुलैच्या तुलनेत यंदा बीपीओ, आयटी सेवा, औषधी आणि जैवतंत्रज्ञान कंपन्या, आयटी हार्डवेअर आणि वैद्यकीय आणि आरोग्य क्षेत्रातील कंपन्यांतील नोकऱ्यांवर कमी परिणाम झाला आहे.
माध्यम, मनोरंजन, बांधकाम आणि अभियांत्रिकीमधील नोकरी भरती ही जुलैमध्ये सुधारल्याचे नौकरी डॉट कॉमचे मुख्य वाणिज्य अधिकारी पवन गोयल यांनी सांगितले. महानगरांमधील नोकरी भरती ही देशांच्या तुलनेत 3 टक्क्यांनी कमी आहे. चेन्नई, मुंबई, बंगळुरू शहरामधून नोकरी भरतीची प्रक्रिया थंडावली आहे. तर चंदीगड, जयपूर आणि कोची यासारख्या लहान शहरांतील नोकरी भरतीच्या प्रक्रियेवर कमी परिणाम झाले आहे.
दरम्यान, कोरोना महामारी आणि टाळेबंदीमुळे देशातील सर्वच क्षेत्रांतील नोकरी भरती थंडावली आहे.