नवी दिल्ली - टेस्ला ही इलेक्ट्रिक कारचे उत्पादन करणारी जगातील आघाडीची कंपनी आहे. मात्र देशात अजूनही ही कार उपलब्ध झालेली नाही. याबाबत टेस्ला कारचे संस्थापक इलॉन मस्क यांनी स्वत:हून खुलासा केला आहे. देशामधील इलेक्ट्रिक कारवरील आयात शुल्क हे खूप जास्त असल्याचे इलॉन मस्क यांनी म्हटले आहे. त्यामुळे ही कार परवडणारी नसल्याचे त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.
इलॉन मस्क यांना एका भारतीय व्यक्तीने टेस्ला कारचे भविष्याबाबत काय नियोजन आहे, असा प्रश्न विचारला. त्यावर उत्तर देताना मस्क यांनी ट्विट केले. देशामध्ये इलेक्ट्रिक कारवरील आयात शुल्क हे १०० टक्क्यापर्यंत आहे. हे ट्विट करून त्यांनी जादा असलेले आयात शुल्क हा भारतामधील टेस्ला लाँच करण्यात अडथळा असल्याचे सूचित केले आहे.
केंद्र सरकारने देशामध्ये इलेक्ट्रिक कारला प्रोत्साहन देण्यासाठी विविध योजना जाहीर केल्या आहेत. नुकतेच इलेक्ट्रिक कारवरील आयात शुल्क हे १२ टक्क्यावरून ५ टक्के करण्यात आले आहेत. मात्र देशातील वाहन उद्योगाचे हितसंरक्षण करण्यासाठी इलेक्ट्रिक कारच्या आयातीवर १२५ टक्के आयात शुल्क लागू आहे.
इलॉन यांनी आयआयटी मद्रासच्या विद्यार्थ्यांशी संवाद करताना २०२० मध्ये भारतामध्ये टेस्ला सुरू करण्यात येईल, असे म्हटले होते. आयआयटी मद्रासच्या आविष्कार हायपरलूप टीमने 'स्पेस एक्स हायपरलूप पॉड स्पर्धा २०१९' च्या अंतिम फेरीपर्यंत मजल मारली होती. ही स्पर्धा अमेरिकन एअरोस्पेस उत्पादक आणि अंतराळ कंपन्यांनी २१ जुलैला आयोजित केली होती.