नवी दिल्ली - नियमभंग करणाऱ्या उद्योगांना केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियूष गोयल यांनी कारवाई करण्याचा इशारा दिला. ते एका कार्यक्रमात सीआयआयमधील सदस्यांशी बोलत होते.
पियूष गोयल म्हणाले, ज्यांनी कोणतीही चूक केली नाही, त्यांना कोणतीही अडचण येणार नाही. मात्र जे चुकीच्या कामात सहभागी आहेत. त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येणार आहे. हाच देशाची संस्कृती आणि मनस्थिती बदलण्याचा एकमेव मार्ग आहे. गुंतवणुकदारांना चुकीचा सल्ला देवू नका, असेही त्यांनी वकिलांना आणि जागतिक कर सल्लागार संस्थांना सांगितले.
पुढे ते म्हणाले, विविध ब्रँड असलेल्या किरकोळ क्षेत्रात थेट विदेशी गुंतवणुकीला परवानगी आहे. अशी गुंतवणूक करणाऱ्या कंपनीने कायद्याचा आदर करावा. त्यातील त्रुटीचा फायदा घेत पळवाट काढू नये.
त्यांनी पीडब्ल्यूसी, डिलाईट, केपीएमजी आणि ई अँड वाय या कंपन्यांना उद्देशून म्हणाले. जर या चार कंपन्यांचे कोणी असेल तर त्यांनी चौप्पट मला क्षमा करा. जर कोणी सभागृहात वकील असतील तर मला क्षमा करा. जो कायदा भारतात प्रचलित नाही, त्याबाबत सल्ला देणे कृपया थांबवा.
उत्पादन वाढविण्यासाठी औद्योगिक आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन अंमलबजावणी विभागाला (डीपीआयआयटी) ५० क्षेत्र निश्चित करण्यास सांगितले आहे. उद्योग आणि निर्यातदारांनी केंद्र सरकारच्या अनुदानावर फारसे अवलंबून राहू नये. तर स्पर्धा करण्यातील सामर्थ्य वाढवावे आणि उत्पादनांचा दर्जा वाढवावा, असा त्यांनी यावेळी सल्ला दिला.