नवी दिल्ली - केंद्रीय अर्थमंत्री पियूष गोयल यांनी वित्तीय तुटीवर नियंत्रण ठेवण्यासाठी नोटा छापण्यात येणार असल्याचे संकेत दिले आहेत. अमेरिकादेखील वित्तीय तुटीचा ताळमेळ राखण्यासाठी नोटा छापत असल्याचे त्यांनी उदाहरण दिले आहे. ते एसपीएमसीआयएलच्या वर्धापनदिनानिमित्त कार्यक्रमात बोलत होते.
पियूष गोयल म्हणाले, अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारच्या काळात वित्तीय जबाबदारी आणि अर्थसंकल्प व्यवस्थापन कायदा २००३ (एफआरबीएम)अस्तित्वात आला. या कायद्याचा उद्देश हा संस्थांची वित्तीय शिस्त, वित्तीय तूट कमी करणे, सूक्ष्म आर्थिक व्यवस्थापन सुधारणे आणि लोकांच्या निधीचे व्यवस्थापन संतुलित अशा अर्थसंकल्पातून करणे हा आहे.
काय आहे एसपीएमसीआयएल
एसपीएमसीआयएल ही राज्य व केंद्र सरकारला सेक्युरिटी कागदपत्रे, बँक नोटा आणि नाण्यांचा पुरवठा करते. चालू आर्थिक वर्षात एसपीएमसीआयएलला ६३० कोटींचा नफा झाला. त्यापैकी २०० कोटी हा लाभांश म्हणून केंद्र सरकारला देण्यात आला आहे. सुत्राच्या माहितीनुसार एसपीएमसीआयएल ही कंपनी 10 हजार मिलियन नोटा मार्चअखेर छापणार आहे.
वित्तीय तुटीचे वाढते प्रमाण चिंताजनक-
चालू आर्थिक वर्षात केंद्र सरकारने वित्तीय तुटीचे उद्दिष्ट कमी करून जीडीपीच्या ३.४ टक्के केले आहे. पियूष गोयल यांनी अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना वार्षिक मदत ६ हजार रुपये, २१ हजार मासिक पगार असलेल्या ७ हजार रुपयांचा बोनस व ५ लाखापर्यंत प्राप्तीकरात माफी असे निर्णय जाहीर केले आहेत. निवडणुकीच्या वर्षात लोकप्रिय ठरलेल्या योजना जाहीर करण्यात आल्याने देशाचे पतमानांकन घसरेल अशी चिंता पतमानांकन संस्था मूडीजने व्यक्त केली आहे.