नवी दिल्ली - कोरोनाच्या संकटात माहिती तंत्रज्ञान (आयटी) कंपन्यांना दिलासा देणारा मोठा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी पार्क्स ऑफ इंडियामध्ये (एसटीपीआय) असलेल्या आयटी कंपन्यांचे चार महिन्यांचे भाडे इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी मंत्रालयाने माफ केले आहे.
कोरोनाचे आव्हान आणि टाळेबंदी पाहता नरेंद्र मोदी सरकारने टेक्नॉलॉजी पार्कमधील छोट्या आयटी कंपन्यांना दिलासा देण्याचा निर्णय घेतल्याचे आयटी मंत्रालयाने म्हटले आहे. देशात एसटीपीआयमध्ये सुमारे २६६ कंपन्या आहेत. या कंपन्यांमध्ये ४ हजार १०० हून अधिक कर्मचारी आहेत. या सर्व मध्यम आयटी कंपन्या, स्टार्टअप व लहान कंपन्या आहेत. या कंपन्यांना १ मार्च ते ३० जूनदरम्यान भाडे द्यावे लागणार नसल्याचे आयटी मंत्रालयाने म्हटले आहे.
हेही वाचा-टाळेबंदीने रद्द झालेल्या विमान तिकिटांचे प्रवाशांना पूर्ण पैसे मिळणार
संकटकाळात दिलासा देण्याकरता हा निर्णय घेण्यात आल्याचेही मंत्रालयाने म्हटले आहे. या माफ करण्यात आलेल्या भाड्य़ाची एकूण रक्कम ५ कोटी रुपये आहे. एसटीपीआयने आयटी कंपन्यांमधील कर्मचाऱ्यांना घरून काम करण्याच्या सूचना केल्या आहेत. तसेच दूरसंचार विभागाने आयटी आणि बीपीओ कंपनीच्या कर्मचाऱ्यांना घरून काम करण्याची परवानगी दिली आहे.
हेही वाचा-टाटाकडून मोलाची मदत; १५० कोटींच्या वैद्यकीय साहित्याचा पुरवठा