नवी दिल्ली – पंतप्रधान मुद्रा योजनेंतर्गत असलेल्या ‘शिशू’ कर्ज श्रेणीत 2 टक्के व्याजदराच्या सवलतीने कर्जदारांना कर्ज मिळणार आहे. याबाबतचा निर्णय केंद्र सरकारने आज घेतला आहे.
केंद्रीय मंत्रिमंडळाने पंतप्रधान मुद्रा योजनेतील शिशू कर्ज श्रेणीसाठी 2 टक्क्यांनी सवलतीत कर्ज देण्यासाठी मंजुरी दिल्याचे माहिती आणि प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी सांगितले. यामध्ये 31 मार्च 2020पर्यंत प्रलंबित असलेल्या कर्जप्रकरणांचा समावेश आहे.
शिशू श्रेणीत कर्जहमीशिवाय सर्व लाभार्थ्यांना एकत्रित 50 हजार कोटी रुपयापर्यंत कर्ज देण्यात येणार आहे. पंतप्रधान मुद्रा योजना ही 8 एप्रिल 2015 ला लाँच करण्यात आली आहे. यामधून 10 लाख कोटींचे कर्ज बिगर कॉर्पोरेट आणि बिगर लघू उद्योगांना देण्यात येते. हे कर्ज वाणिज्य बँक, प्रादेशिक ग्रामीण बँक, लघू वित्तीय बँका, बिगर बँकिंग वित्तीय कंपन्यांकडून दिले जाते.