नवी दिल्ली – कोरोना महामारीत प्रवाशांचा प्रतिसाद नसतानाही विमानाच्या तिकीट दरात लवकरच वाढ होणार आहे. कारण केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने विमान वाहतूक सुरक्षा शुल्कात (एएसएफ) वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. हे वाढीव शुल्क 1 सप्टेंबरपासून देशातील आणि आंतरराष्ट्रीय विमान तिकीटांवर लागू होणार आहे.
देशात विमान वाहतूक सुरक्षा शुल्क हे 150 रुपयांवरून 160 रुपये करण्यात येणार आहे. तर आंतरराष्ट्रीय विमान वाहतूक सुरक्षा शुल्क हे 4.85 डॉलरवरून 5.2 डॉलर करण्यात येणार आहे. विमान कंपन्यांकडून तिकीटदराबरोबर एसएफ हे प्रवाशांकडून घेण्यात येते. या शुल्काचा वापर हा देशभरातील विमानतळावरील सुरक्षा व्यवस्थेसाठी करण्यात येतो. यापूर्वी केंद्री नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने वर्षभरापूर्वी विमान वाहतूक सुरक्षा शुल्क वाढविले होते.
देशातील विमान कंपन्या आर्थिक संकटात -
कोरोना महामारीतल निर्बंधामुळे देशातील विमान कंपन्या आर्थिक संकटात आहेत. त्या पार्श्वभूमीवर विमान कंपन्यांनी कर्मचाऱ्यांची वेतन कपात, भत्त्यांत कपात, कर्मचाऱ्यांना कामावरून काढणे असे निर्णय घेतले आहेत. देशांतर्गत विमान सेवा टाळेबंदीनंतर 25 मे रोजी सुरू केली आहे. मात्र, अद्याप आंतरराष्ट्रीय विमान वाहतूक सेवेवर निर्बंध कायम आहेत.