नवी दिल्ली – केंद्र सरकारने हेल्मेटचा दर्जा हा भारतीय मानक ब्युरोच्या (बीआयएस) नियंत्रणाखाली आणण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. रस्ते अपघातामधील मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी हा निर्णय घेण्यात येणार असल्याचे रस्ते आणि महामार्ग मंत्रालयाने म्हटले आहे.
सरकारकडून प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर देशात केवळ बीआयएस दर्जाचे हेल्मेटचे उत्पादन आणि विक्री करणे शक्य होणार आहे. दुचाकीस्वारांना संरक्षणासाठी बीआयएस प्रमाणित हेल्मेट घालणे बंधनकारक करण्याचा कच्चा आराखडा केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने तयार केला आहे. त्यामुळे बीएसआय प्रमाणित नसलेल्या हेल्मेटचे उत्पादन आणि विक्रीवर आपोआप निर्बंध लागू होणार आहेत. या निर्णयाने दुचाकीसाठी वापरण्यात येणाऱ्या हेल्मेटचा दर्जा वाढणार आहे. तर रस्त्यांवरील सुरक्षितता वाढणार आहे.
हेल्मेटचा दर्जा सुधारल्याने गंभीर अपघातांमधील दुचाकीस्वारांच्या मृत्यूचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल, असे केंद्रीय रस्ते आणि महामार्ग मंत्रालयाने म्हटले आहे.
दरम्यान, भारतीय मानक ब्युरो ही उत्पादनांच्या दर्जाबाबत कठोर निकष तयार करते. त्या कठोर निकषांची पूर्तता करणाऱ्या उत्पादनांनाच मानक ब्युरोकडून प्रमाणपत्र दिले जाते. त्यामागे ग्राहकांना दर्जेदार वस्तुंची खरेदी करणे शक्य व्हावे, हा हेतू असतो.