नवी दिल्ली - केंद्र सरकारने सीरम इन्स्टिट्यूट आणि भारत बायोटेकला कोरोना लशीची किंमत कमी करण्याची सूचना केली आहे. संकटाच्या काळात लस कंपन्यांकडून नफेखोरी होत असल्याची विविध राज्यांनी केंद्र सरकारकडे तक्रार केली आहे.
केंद्रीय कॅबिनेट सचिव राजीव गौबा यांच्या अध्यक्षतेखालील झालेल्या बैठकीत कोरोना लशीच्या किमतीबाबत चर्चा करण्यात आली आहे. त्यामुळे सीरम इन्स्टिट्यूट आणि भारत बायोटेककडून लशीच्या सुधारित किमती देण्यात येण्याची शक्यता आहे.
हैदराबादमधील भारत बायोटेकने तयार केलेल्या कोव्हॅक्सिनची किंमत सरकारसाठी 600 रुपये प्रति डोस आणि खासगी रुग्णालयांसाठी 1,200 रुपये प्रति डोस आहे. तर पुण्यातील सीरमच्या लशीची किंमत राज्य सरकारसाठी 400 रुपये तर खासगी रुग्णालयांसाठी 600 रुपये आहे. मात्र, दोन्ही लस उत्पादक कंपन्यांनी केंद्र सरकारसाठी प्रति डोस 150 रुपये किंमत ठेवली आहे.
हेही वाचा-केंद्राकडून मिळणाऱ्या आर्थिक मदतीचे सीरमकडून स्वागत
कोरोना लशीच्या किमतीमध्ये फरक नसल्याने विविध राज्यांनी केंद्र सरकारकडे आक्षेप नोंदविला आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी अशा काळात नफेखोरी करणे योग्य नसल्याचे म्हटले होते. केंद्र सरकारने 1 मेपासून 18 वर्षांहून अधिक वयाच्या सर्व भारतीयांसाठी कोरोना लस देण्याचा निर्णय घेतला आहे.
हेही वाचा-कच्चा माल द्या, सीरमच्या पूनावालांचे अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना साकडे
केंद्र सरकारने भारत बायोटेकसाठी 1500 कोटी रुपये तर सीरमसाठी 3 हजार कोटी रुपये लस उत्पादनासाठी मंजूर केले आहेत.