नवी दिल्ली - केंद्र सरकार हे रेशन दुकानातून अतिरिक्त १६.३ कोटी कुटुंबांना १ किलो साखर पुरविण्यासाठी नियोजन करत आहे. त्यासाठी सरकारला ४ हजार ७२७ कोटी रुपये अनुदासाठी खर्च करावे लागणार आहेत. या निर्णयामुळे मान्सूनपूर्वी असलेल्या साखरेचा शिल्लक साठा कमी होण्यासाठी मदत होणार आहे.
एनडीए सरकारच्या पहिल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत साखर अतिरिक्त कुटुंबांना देण्याबाबत चर्चा करण्यात आली. त्याबाबतचा प्रस्ताव हा अन्नधान्य मंत्रालयाने तयार केला आहे. मात्र, त्याबाबत केंद्रीय मंत्रिमंडळाने कोणताही निर्णय घेतला नाही. या योजनेतून लाभार्थ्यांना गहू की तांदूळ द्यायचा याबाबत विचार करण्याचे मंत्रिमंडळाने अन्नधान्य मंत्रालयाला सूचविले आहे.
सध्या अंत्योदय अन्न योजनेतून १३ रुपये ५० पैसे प्रति किलो दराने २.५ कोटी कुटुंबांना साखरेचे वाटप होते. राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्यानुसार (एनएफएसए) सरकार हे दर महिन्याला ५ किलो धान्य ८० कोटी लोकांना देते. त्यासाठी सरकारकडून मोठ्या प्रमाणात अनुदान देण्यात येते. लाभार्थ्याला गहू हे प्रति किलो २ रुपये तर तांदूळ प्रति किलो ३ रुपये दराने दिले जाते.
अन्नधान्य महामंडळाकडून (फूड कॉर्पोरेशन) अन्नधान्याचा साठा केला जातो. मात्र, पुरेशी जागा नसल्याने काही ठिकाणी धान्याचा साठा खुल्या जागेत करावा लागतो. त्यामुळे मान्सूनपूर्वी हा अन्नधान्याचा साठा खुला करण्याचे महामंडळासमोर आव्हान आहे. गेल्यावर्षी गहू आणि तांदळाचे प्रचंड उत्पादन झाल्याने अन्नधान्य महामंडळाकडील राखीव साठा क्षमतेहून अधिक झाला आहे.