मुंबई - येत्या काही दिवसात सण जवळ आले असताना सोने खरेदी करणे महागणार आहे. कारण सोन्याच्या दराने आज विक्रमी भाववाढ नोंदविली आहे. सोने आज प्रति तोळा ४० हजार रुपये झाले आहे.
सोन्याला आजपर्यंतचा सर्वात अधिक भाव मिळाला आहे. मात्र, हा भाव अमेरिकन डॉलरच्या तुलनेत २० टक्के कमी मिळाला असल्याचे ऑल इंडिया जेम्स अँड ज्वेलरी फेडरेशनचे माजी चेअरमन बच्छराज बमलवा यांनी सांगितले. जागतिक राजकारण आणि व्यापारी युद्धामुळे सोन्याचे दर वाढल्याचे त्यांनी सांगितले. येत्या महिन्यात सोने प्रतितोळा हे ४१ हजार रुपये होईल, असा त्यांनी अंदाज व्यक्त केला.
जुन्या सोन्याचे दागिने घडविण्याकडे ग्राहकांचे राहणार प्राधान्य-
पुढील महिन्यात लग्नसराई आणि सण जवळ आले असताना सोन्याची मागणी १० टक्के कमी होईल, असे ते म्हणाले. सध्या सोन्याचे दर २५ टक्क्यांनी वाढले आहेत. अशा परिस्थितीमध्ये नवी सोने खरेदी करण्यापेक्षा जुन्या सोन्याचे दागिने घडविणे याकडे ग्राहक वळतील असा त्यांनी अंदाज व्यक्त केला.
दिवाळीपर्यंत सोन्याचा दर प्रति तोळा ४१ हजार रुपये होण्याची शक्यता-
सध्याचे जागतिक संकट कायम राहिले तर दिवाळीपर्यंत सोने ४१ हजार रुपये प्रति तोळा होईल, अशी त्यांनी शक्यता व्यक्त केली. हे उद्योगासाठी आरोग्यदायी चिन्ह नसल्याचे त्यांनी म्हटले. दरवर्षी भारतीय ग्राहक ७०० ते ८०० टन सोन्याची खरेदी करत असल्याचे त्यांनी सांगितले.
सोन्याची विक्री घटली, घडणावळ वाढली-
मुंबई ज्वेलर्स फेडरेशनचे अध्यक्ष राकेश शेट्टी म्हणाले, जुन्या सोन्याची घडणावळ (पुनर्वापर) करण्याचे प्रमाण ७० टक्क्यांनी वाढले आहे. तर विक्री ६५ टक्क्यांनी घटली आहे. सध्या सोन्याचे दर खूप वाढले आहेत. त्यामुळे साहजिकच ग्राहक हे सोन्याची घडणावळ करण्यासाठी पैसे देण्यासाठी प्राधान्य देतील. तर खरेदीचे प्रमाण कमी करतील, अशी त्यांनी शक्यता व्यक्त केली.