मुंबई - एकदातरी विमानाने प्रवास करावा, असे बहुतेकांचे स्वप्न असते. अशा व्यक्तींना अल्पदरात विमान प्रवास करणे आता शक्य होणार आहे. कारण गोएअर या विमान कंपनीने फक्त ८९९ रुपयात विमान प्रवासाची ऑफर देऊ केली आहे.
गोएअरचा मेगा मिलियन सेल २७ मेपासून सुरू होणार आहे. या ऑफरमध्ये प्रवाशांना १५ जून ते ३१ डिसेंबरदरम्यान प्रवास करता येणार आहे. या ऑफरमध्ये जास्तीत जास्त १० लाख प्रवाशांना लाभ घेता येणार आहे. या ऑफरमध्ये तिकिटांचे दर हे ८९९ रुपयांपासून सुरू होत असल्याचे गोएअर इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक जेह वाडिया यांनी सांगितले. विशेष म्हणजे विमान तिकिटाचे दर वाढत असताना कंपनीने ऑफर देऊन सर्वांचेच लक्ष वेधले आहे. ग्राहकांना विमान प्रवासासाठी त्यांच्या सोयीप्रमाणे वेळ व तारीख निवडता येणार आहे.
अशा आहेत गोएअरच्या ऑफर -
पेटीएम वॉलेटमधून किमान २ हजार ४९९ रुपयाचे तिकीट बुक केल्यास ५०० रुपये कॅशबॅक दिले जाणार आहे. तर मिंत्रा अॅप व वेबसाईटवरून किमान १ हजार ९९९ रुपयांचे तिकीट खरेदी केल्यास ग्राहकांना १० टक्के सवलत मिळणार आहे. यासाठी किमान ३१ ऑगस्टची मुदत देण्यात आली आहे.
झुमकारवरून तिकीट बुक केल्यास १ हजार ५०० रुपये अथवा २० टक्के सवलत दिली जाणार आहे. ग्राहकांना ३१ डिसेंबरपर्यंत तिकीट बुकिंग करता येणार आहे. तर कुपनकोडवरील तिकीट खरेदीवरही सवलत दिली जाणार आहे. दरम्यान, मुंबईची कंपनी असलेली 'गोएअर'च्या विमानांची रोज २७० उड्डाणे होतात.