नवी दिल्ली - रिलायन्स रिटेलच्या मानाच्या शिरपेचात आणखी एक तुरा खोवला गेला आहे. सिंगापूरच्या सार्वभौम संपत्ती कंपनी जीआयसी ही रिलायन्स रिटेलचा १.२२ टक्के हिस्सा विकत घेणार आहे. त्यासाठी जीआयसी रिलायन्सला ५,५१२.५ कोटी रुपये देणार आहे.
रिलायन्स रिटेलने शेअर बाजाराला माहिती दिली आहे. रिलायन्स रिटेलमध्ये अबुधाबीची सार्वभौम संपत्ती कंपनी असलेली मुबादला कंपनीने ६ हजार २४७.५ कोटी रुपयांची गुंतवणूक करणार असल्याचे रिलायन्सने गुरुवारी जाहीर केले. त्या बदल्यात मुबादला कंपनीला रिलायन्स रिटेलचा १.४ टक्के हिस्सा मिळणार आहे. रिलायन्स रिटेलमध्ये जनरल अटलांटिक ३ हजार ६७५ कोटी रुपये व सिल्व्हर लेक १ हजार ८७५ कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. दोन्ही कंपन्या रिलायन्स रिटेलमध्ये २.१३ टक्के हिस्सा घेऊन ९ हजार ३७५ कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. यापूर्वी केकेआरने १.२८ टक्के हिस्सा घेण्यासाठी रिलायन्स रिटेलमध्ये ५ हजार ५५० कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे.
हेही वाचा-कर्जफेडीच्या मुदतवाढीतील चक्रवाढ व्याज माफ करू; केंद्र सरकारची सर्वोच्च न्यायालयात माहिती
मुकेश अंबानी यांनी ही दिली प्रतिक्रिया-
जीआयसीच्या गुंतवणुकीबाबत प्रतिक्रिया देताना मुकेश अंबानी म्हणाले, जीआयसीला जगभरात गुंतवणुकीचा चाळीस वर्षांचा अनुभव आहे. रिलायन्स रिटेलबरोबर जीआयसी भागीदारी करत असल्याचा मला आनंद होत आहे. भारतीय किरकोळ विक्रीचे चित्र बदलणे हे रिलायन्स रिटेलचे मिशन आहे. जीआयसीचे जागतिक नेटवर्क आणि दीर्घकाळासाठी गुंतवणूक हे भारतीय किरकोळ विक्रीत परिवर्तन घडवून आणणार आहे. ही गुंतवणूक म्हणजे आमच्या रणनीतीला आणि भारतामधील प्रचंड क्षमतेला समर्थन आहे.
हेही वाचा-खूशखबर! जीएसटी वार्षिक रिटर्न्स भरण्याची अंतिम मुदत वाढवली; जाणून घ्या परिणाम...
दरम्यान, नियामक संस्थेच्या परवानगीनंतर जीआयसीला रिलायन्स रिटेलमध्ये प्रत्यक्षात गुंतवणूक करता येणार आहे.