मुंबई - कोरोनाचा प्रसार होत असल्याने उद्योग ठप्प झाले आहेत. अशा स्थितीत रत्ने आणि मौल्यवान दागिने प्रोत्साहन परिषदेने (जीजेईपीसी) कर्मचाऱ्यांना दिलासादायक निर्णय घेतला आहे. या परिषदेने कर्मचाऱ्यांना ५० कोटींचा निधी देण्याचे जाहीर केले आहे.
कोरोनामुळे जग अभूतपूर्व अशा अडचणीमधून जात आहे. भारतालाही कोरोना या प्राणघातक विषाणूने विळखा घातला आहे. अशा कठीण काळात कर्मचाऱ्यांची काळजी घेणे अनिवार्य असल्याचे जीजेईपीसीचे चेअरमन प्रमोद अग्रवाल यांनी म्हटले आहे. या क्षेत्रामध्ये सुमारे ५० लाख लोकांना रोजगार दिला जातो. अशा परिस्थितीला तोंड देण्यासाठी कर्मचाऱ्यांच्या कल्याणासाठी ५० कोटींचा निधी देण्याचा निर्णय घेतला आहे.
हेही वाचा-महत्त्वाचे पाऊल : जीवनावश्यक वस्तुंचा पुरवठा सुरळित राहण्याकरता स्वतंत्र कक्ष
संघटनेच्या सर्व सदस्यांनी लॉकडाऊनच्या कालावधीत कर्मचाऱ्यांना मदत करण्याचे अग्रवाल यांनी आवाहन केले आहे. तसेच एकता व मानवतेचा दृष्टीकोन दाखवावा, असे संघटनेने म्हटले आहे. केंद्रीय अर्थमंत्र्यांनी ५ कोटी रुपयांहून कमी उलाढाल असलेल्या कंपन्यांना जीएसटीवर ३० जूनपर्यंत व्याज, दंड लागणार असल्याचे घोषणा केली आहे. याचा एमएसएमई क्षेत्राला फायदा होईल, असे जीजेईपीसीचे उपाध्यक्ष कोलीन शाह यांनी सांगितले.
हेही वाचा-बांधकाम मजुरांसाठी अर्थमंत्री सीतारामन यांचा दिलासादायक निर्णय