लातूर - दुष्काळ आणि मंदी असताना जिल्ह्यातील वाहन उद्योगाला सणासुदीदरम्यान संजीवनी मिळाल्याचे चित्र आहे. बाजारपेठात शुकशुकाट असताना अनेक लातूरकरांनी वाहन खरेदीची हौस पूर्ण केली आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा वाहन विक्रीत किंचितशी घट झाली आहे.
यंदा जिल्ह्यातील प्रत्येक सणादरम्यान दुष्काळाचा बाजारपेठेवर परिणाम दिसून आला. अशातच दिवाळीपर्यंत दुष्काळाबरोबर आर्थिक मंदी, असे दुहेरी संकट निर्माण झाले होते. त्यामुळे उद्योजक आणि शेतकरी हे वाहन खरेदीकडे वळणार का, अशी वाहन उद्योगामधून चिंता व्यक्त होत होती. मात्र, दिवाळीच्या मुहूर्तावर जिल्ह्यात तब्बल 3 हजार 862 दुचाकींची विक्री झाली आहे. तर 419 चार चाकी वाहनांची विक्री झाली आहे.
हेही वाचा-वाहन उद्योगांवरील मंदीचे सावट कायम; प्रवासी वाहनांच्या विक्रीत सलग ११ व्या महिन्यात घट
2018 च्या तुलनेत दुचाकींच्या विक्रीत 6 टक्के घट झाली आहे. तर चारचाकी वाहनांच्या खरेदीत 3 टक्के घट झाली आहे. गतवर्षीच्या तुलनेत वाहन विक्रीत घट झाली असली तर त्या प्रमाणात वाहन विक्रीला फटका बसला नसल्याचे वाहन उद्योगातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
हेही वाचा-ऑक्टोबरच्या सणासुदीतही बजाज ऑटोच्या मोटारसायकल विक्रीत १४ टक्के घसरण
शहरातील व्यापारी आणि उद्योजकांनी वाहनांची खरेदी मोठ्या प्रमाणात केली असल्याचे समोर आले आहे. तर ग्रामीण भागातील नागरिकांनी वाहन खरेदीकडे पाठ फिरवली आहे. दुचाकी, कार आणि शेतीकरिता आवश्यक असलेल्या ट्रॅक्टरची विक्री मोठ्या प्रमाणात झाली आहे. तर सर्वात कमी म्हणजे केवळ एका क्रेनची सणादरम्यान विक्री झाली आहे. एकंदरीत जिल्ह्यावर दुष्काळाचे सावट असतानाही शहरी भागातील नागरिकांनी हौसेचे मोल दाखविल्याने वाहन उद्योगाला काहीशी संजीवनी मिळाली आहे.
वाहन उद्योग आहे संकटात
ऑक्टोबरमध्ये दिवाळी व दसरा असे सण असल्याने वाहन विक्री होईल, अशी वाहन उद्योगाला अपेक्षा होती. तरीही बजाज ऑटोच्या मोटारसायकल विक्रीत ऑक्टोबरमध्ये 14 टक्के घसरण झाली आहे. वर्षभर ग्राहकांची मागणी घटल्याने सर्वच वाहन कंपन्यांनी उत्पादन प्रकल्प काही दिवसांसाठी बंद ठेवले होते.