नवी दिल्ली - महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून सर्वच क्षेत्रात काम करत आहेत. असे असले तरी महिलांची कामगार मनुष्यबळात पिछेहाट होत आहे. याबाबतची माहिती डिलॉईट अहवालात प्रसिद्ध करण्यात आली आहे. २००५ मध्ये महिलांचे कामगार मनुष्यबळात एकूण प्रमाण ३६.७ टक्के होते. हे प्रमाण घसरून २०१८ मध्ये २६ टक्क्यांवर पोहोचले आहे.
चौथ्या औद्योगिक क्रांतीसाठी भारतातील महिला व मुलींचे सक्षमीकरण असा अहवाल डिलॉईटने प्रसिद्ध केला आहे. देशात एकूण काम करणाऱ्या महिलांपैकी ९५ टक्के महिला या असंघटित क्षेत्रात काम करत असल्याचे अहवालात म्हटले आहे. त्यांचे सक्षमीकरण करण्यासाठी शिक्षणाची व्यवस्था सुधारण्याची गरज व्यक्त करण्यात आली आहे. शिक्षणाचा अभाव, दर्जेदार शिक्षणाचा अभाव, हे मुली व महिलांसमोर आव्हाने आहेत. तसेच सामाजिक, आर्थिक, राजकीय बंधने असल्यामुळे महिलांना मर्यादित संधी मिळत आहेत.
दर्जेदार शिक्षण आणि कौशल्यांचा पुनर्विकास यातून भारतीय महिलांचा पुनर्विकास होऊ शकेल, असे अहवालातून सुचविण्यात आले आहे. चौथ्या औद्योगिक क्रांतीसाठी महत्त्वाचे असणारे तंत्रज्ञान, डिजीटल व ऑटोमेशन यामध्ये महिला आहेत. पण त्यांच्याकडे कमी कौशल्य असल्याने त्यांना कमी पगार दिला जात आहे. भविष्यातही या महिलांच्या मनुष्यबळात घट होणार असल्याची शक्यता डिलॉईटने व्यक्त केली आहे.