गंगापूर(औरंगाबाद) - जर इच्छाशक्ती व नियोजन असेल तर शेतकरी यशस्वीपणे शेतीमधून मिळवू शकतो. हे गंगाखेड तालुक्यात बगडी येथील बोडखे शेतकरी कुटुंबाने दाखवून दिले आहे. त्यांनी दोन एकर क्षेत्रातून चार लाखापर्यंतचे उत्पादन मिळविले आहे.
गंगापूर तालुक्यातील गोदावरी नदीच्या पट्ट्यात ऊसाची मोठ्या प्रमाणात शेती केली जाते. ऊस, गहू कांदा पीक घेणासाठी अधिकचा खर्च येत असल्याने बहुतांश शेतकऱ्यांनी आधुनिक पद्धतीने शेती करण्यास सुरुवात केली आहे. बगडी येथील एकत्रित कुटूंबामध्ये राहणारे शेतकरी कैलास बोडखे, सीताराम बोडखे, श्रीकांत बोडखे या तीन भावंडाकडे वडिलोपार्जित 35 एकर शेती आहे. त्यात ते ऊस, कांदा, गहू पिकांचे उत्पादन घेत आहेत. मात्र, हे पीक घेण्यासाठी खर्चही भरपुर करावा लागत असल्याने पारंपरिक पीक पद्धतीत बदल करून त्यांनी दोन एकर केळीची सेंद्रिय पद्धतीने लागवड करायचा निर्णय घेतला. दोन एकर क्षेत्रात अजीत G9 या वाणाची दोन हजार दोनशे रोपांची लागवड केली. या केळी लागवडीतून त्यांना चार लाख रुपयांपर्यंत उत्पादन मिळाले.
हेही वाचा-घराचे स्वप्न साकारणे सुलभ; स्टेट बँकेकडून व्याजदरात कपात
सेंद्रिय पध्दतीने केले केळीचे व्यवस्थापन-
बोडखे शेतकरी कुटुंबाने केळीची सेंद्रीय पद्धतीने उत्पादन व त्यानंतर स्वत: विक्री करून भरघोस उत्पन्न मिळविले. दहा ते पंधरा देशी गाई असल्याने केळी लागवडीनंतर शेतात कुजलेले शेणखत वापरले. देशी गाईच्या गोमुत्रापासुन व शेणापासून जीवामृत, घनजीवामृत या सेंद्रिय खतांचा वापर करून केळी पिकांसाठी खतांचे व्यवस्थापन केले.
हेही वाचा-खूषखबर! कोरोनाविरोधातील लस खासगी रुग्णालयात मिळणार फक्त २५० रुपयांत!
केळीची स्वत:च केली विक्री!
केळीचे पीक त्यांनी जोमदार आणले. मात्र, लॉकडाऊनच्या काळात काढणीला आलेल्या केळीची विक्री कोठे करावी, असा प्रश्न बोडखे कुटुंबीयापुढे उभा राहिला. काही स्थानिक व्यापाऱ्याशी त्यांनी संपर्क केला. परंतु लॉकडाऊन असल्याचे कारण देत व्यापाऱ्यांनी अत्यंत कमी दरात केळीची मागणी केली. बोडखे शेतकरी कुटुंबाने व्यापाऱ्यांना 8 रुपये किलो दराने 10 टन केळी दिली. मात्र, कमी दर मिळाल्याने बोडखे शेतकरी कुटुंब असमाधानी होते.
चिप्स बनवून विक्री करण्याचा घेतला निर्णय-
केळीला अत्यंत कमी दर मिळत असल्याने त्यांनी नैसर्गिकरित्या केळी पिकवून व चिप्स बनवून विक्री करण्याचा निर्णय घेतला. लॉकडाऊन असल्याने बाजार बंद असल्याने सुरुवातीला गावागावात केळी व चिप्स विक्री करण्यास सुरुवात केली. कोणतेही रसायन न वापरता नैसर्गिकरित्या पिकवलेली केळी खाण्यास चविष्ट लागतात. त्यामुळे या केळीची मोठी मागणी वाढली.
कष्टाला योग्य नियोजनाची जोड असेल तर शेती नक्कीच फायदेशीर
आसपास गावातील नागरिक थेट शेतात येऊन केळी खरेदी करू लागली आहेत. लॉकडाऊनच्या अटी शिथील झाल्याने खेड्यापाड्यात भरणाऱ्या छोट्या बाजारात मोठ्या प्रमाणात स्वत: केळीची विक्री करण्यास सुरुवात केली. सोशल मीडियाचा वापर करून ऑनलाई पद्धतीनेही त्यांनी केळीची विक्री केली आहे. केळीवर प्रकिया करून चिप्स पार्सलमध्ये देण्याचे काम सुरू केले आहे. एका किलो चिप्सला 200 किलोप्रमाणे भाव मिळाला आहे. 2 एकर क्षेत्रात त्यांना 4 लाख रुपयांचे उत्पादन मिळाले आहे. कष्टाला योग्य नियोजनाची जोड असेल तर शेती नक्कीच फायदेशीर ठरते, असे बोडखे कुंटुबियांनी सांगितले.