लंडन - जगभरात २०० कोटीहून अधिक वापरकर्ते असलेले फेसबुक, क्रिप्टोचलन पुढील वर्षी आणणार आहे. ग्लोबलकॉईन हे नव्या डिजीटल पेमेंट व्यवस्थेतून १२ हून अधिक देशात सुरू होणार असल्याचे इंग्लंडमधील माध्यमाने म्हटले आहे.
क्रिप्टोचलन सुरू करण्यासाठी फेसबुकने अमेरिका आणि इंग्लंडमधील वित्तीय नियामकांशी चर्चा सुरू केली आहे. बँक ऑफ इंग्लंडचे गव्हर्नर मार्क कॅरने आणि अमेरिकेच्या ट्रीझरीच्या अधिकाऱ्यांशी फेसबुक कंपनी संपर्कात आहे. फेसबुक चीनच्या वूईचॅटप्रमाणे वापरकर्त्यांना खरेदी करण्यासाठी फीचर देणार आहे. फेसबुकचे क्रिप्टोचलन हे डॉलरशी संलग्न असणार आहे. त्यामुळे ते स्थिर राहणार असून बिटकॉईनसारखे ढासळणार नाही, असे अमेरिकेतील माध्यमाने म्हटले आहे.
काय आहे क्रिप्टोचलन
क्रिप्टोचलन हे आभासी चलन असते. त्याची ऑनलाईन खरेदी अथवा विक्री करता येते. ऑनलाईन खरेदीसाठी काही व्यवहारात क्रिप्टोचलन स्वीकारले जाते. अद्याप आरबीआयने देशात क्रिप्टोचलनचा वापर करण्याला परवानगी दिलेली नाही.
असा आहे लिब्रा कंपनीचा प्रकल्प-
फेसबुकने काही आठवड्यांपूर्वी लिब्रा नेटवर्कची जीनिव्हामध्ये सुरुवात केल्याचे अमेरिकेच्या माध्यमांनी म्हटले होते. लिब्रा हा फेसबुकचा अंतर्गत प्रकल्प आहे. या प्रकल्पातून डिजिटल चलन विकसित केले जाणार असल्याचे वृत्तात म्हटले होते. लिब्रा कंपनीकडून डिजिटल चलनासाठी लागणारे पेमेंट, ब्लॉकचेन, अॅनालिटीक्स आणि बिग डाटा विकसित करण्यात येणार आहे. त्याचबरोबर सॉफ्टवेअर व हार्डवेअरदेखील विकसित करण्यात येणार आहे. फेसबुक सुमारे १२ वित्तीय संस्था आणि ऑनलाईन मर्चंटस नोकरीत घेत असल्याचे अमेरिकेतील माध्यमाने यापूर्वी म्हटले होते. तर दुसऱ्या एका माध्यमानेदेखील फेसबुकची ५० जणांची टीम आभासी चलनावर काम करत असल्याचे म्हटले होते. यावर फेसबुकने प्रतिक्रिया दिलेली नाही.
ब्लॉकचेनबाबत मार्कने ही दिली होती प्रतिक्रिया -
विशेष म्हणजे फेसबुकचे सीईओ मार्क झुकेरबर्ग यानेदेखील 'हॉवर्ड लॉ'च्या प्राध्यापकांना दिलेल्या मुलाखतीत ब्लॉकचेनच्या तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करण्याची इच्छा असल्याचे म्हटले होते.
विकेंद्रीकरण अथवा ब्लॉकचेनला अधिकृतपणा देण्याबाबत विचार करत असल्याचे मार्कने म्हटले. त्याबाबत नेमके कोणत्या पद्धतीने करायचे हे निश्चित केलेले नाही. मात्र अधिकृतपणा देण्यासाठी विविध सेवांचा वापर होवू शकतो, असे मार्कसने स्पष्ट केले होते.