बंगळुरू - कोरोनाच्या संकटातही बंगळुरूच्या न्यूटन स्कूल या स्टार्टअपने यश मिळविले आहे. व्हेंचर कॅपिटल कंपनी नेक्स व्हेंचर पार्टनरने न्यूटन स्कूलमध्ये ६ लाख ५० हजार डॉलरची बीज भांडवल गुंतवणूक केली आहे.
गुंतवणुकीच्या फेरीमध्ये अनअॅकडमीचे संस्थापक गौरव मुंजाल, रोमन साईनी, हिमेश सिंह यांनी सहभाग घेतला. त्याचबरोबर अमेरिकेचे स्टार्टअप प्लॅटफॉर्म अँजललिस्ट, अपवर्कचे संस्थापक श्रीनिवास अनुमोलू, शिक्षणतज्ज्ञ अजय गुप्ता आणि साहिल अग्रवाल आणि ग्रोथस्टोरीचे के. गणेश यांनी गुंतवणुकीच्या फेरीमध्ये सहभाग घेतल्याचे दिसून आले.
न्यूटन स्कूल हा ऑनलाइन इजुटेक प्लॅटफॉर्म आहे. यामध्ये अद्ययावत तंत्रज्ञानाचे डेव्हलपर होण्यासाठी विद्यार्थ्यांना शिकविण्यात येते. त्यामुळे ऑनलाइन शिकणाऱ्या व्यक्तींना आघाडीच्या कंपन्या आणि स्टार्टअपमध्ये संधी मिळू शकते. या स्टार्टअपमधून सहा महिन्यांचे मोफत प्रशिक्षण देण्यात येते. विद्यार्थ्यांना वार्षिक ६ लाखांचे पॅकेज मिळेपर्यंत कोणतेही शुल्क घेण्यात येत नाही.
हेही वाचा-ड्रॅगनची देशातील १,६०० कंपन्यांमध्ये चार वर्षात १ अब्ज डॉलरची गुंतवणूक
सॉफ्टवेअर अभियांत्रिकीमधून सर्वाधिक वेतन आणि सर्वाधिक करियरची प्रगती होते. मात्र, आजपर्यंत हे कोर्स आघाडीच्या महाविद्यालयांमध्येच उपलब्ध होते. मात्र, कंपनीने विद्यार्थ्यांना फी भरण्यासाठी अनोखा पर्याय देत कोर्स उपलब्ध करून दिले आहेत. त्यामुळे कोणतीही आर्थिक परिस्थिती आणि ठिकाण असले तरी, त्यांना चांगले सॉफ्टवेअर डेव्हलपर होणे शक्य असल्याचेही सिद्धार्थ माहेश्वरी यांनी सांगितले.
हेही वाचा-सलग सहाव्यांदा ऑगस्टमध्ये निर्यातीत घसरण; व्यापारातील तुटीचे प्रमाणही कमी
न्यूटन स्कूलची २०१९मध्ये आंत्रेप्रेन्युअर निशांत चंद्रा आणि सिद्धार्थ माहेश्वरी यांनी स्थापना केली आहे. सध्या न्यूटन स्कूलमध्ये ५०० विद्यार्थी शिकत आहेत. पुढील वर्षापर्यंत १० विद्यार्थ्यांना शिकविण्याचे उद्दिष्ट निश्चित केल्याचे निशांत यांनी सांगितले. हे कोर्स आयआयटीप्रमाणे आहेत. निशांत म्हणाले की, निधीचा उपयोग कंपनी उत्पादन आणि विस्तारासाठी करणार आहे. आम्ही विद्यार्थ्यांना कृत्रिम मानवी बुद्धिमत्तेची विविध उत्पादने प्राधान्याने उपलब्ध करून देणार आहोत. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याला वैयक्तिक शिकण्याचा अनुभव घेणे शक्य होणार आहे.