चेन्नई - विदेशी विनिमय व्यवस्थापन कायद्यातील (फेमा) तरतुदींचे उल्लंघन करणे स्टँण्डर्ड चार्टड बँकेला महागात पडले आहे. फेमांतर्गत असलेल्या न्यायालयीन यंत्रणेने (ईडी) स्टँण्डर्ड चार्टड बँकेला १०० कोटींचा दंड ठोठावल्याची माहिती सक्त अंमलबजावणी संचालनालयाने दिली आहे.
फेमांतर्गत असलेल्या न्यायालयीन यंत्रणेने तामिलनाड मर्केन्टाईल बँकेला ( टीएमबी) १७ कोटींचा दंड ठोठावला आहे. तर या बँकेचे चेअरमन आणि संचालक एम. जी. एम. मरन यांना ३५ कोटींचा दंड ठोठावला आहे.
ईडीच्या माहितीनुसार टीएमबी व मुंबई येथील स्टँण्डर्ड चार्टड बँकेतील व्यवहारात फेमा कायद्याचे उल्लंघन झाल्याची माहिती आरबीआयने दिली होती. या माहितीवरून ईडीकडून तपास करण्यात येत होता. या तपासादरम्यान ईडीने टीएमबी, बँकेचे संचालक आणि स्टँण्डर्ड चार्टड बँकेला कारणे दाखवा नोटीस बजावली होती.
ईडीच्या दक्षिण विभागाच्या विशेष संचालकांनी न्यायालयीन आदेश काढून टीएमबीला ११.३३ कोटी रुपयांचा दंड ठोठावला. या बँकेने विदेशातील सात कंपन्यांना ४६ हजार ८६२ शेअर हस्तांतरित केले होते. या सातही कंपन्यांना आरबीआयने वैधता दिली नव्हती. त्यामुळे फेमा कायद्याचे उल्लंघन झाले होते. हा व्यवहार करण्यासाठी स्टँण्डर्ड बँकेने आरबीआयच्या परवानगीशिवाय ११३ कोटी रुपयांची रक्कम शेअर व्यवहारासाठी जमा केली होती. त्यामुळे बँकेला ३४ कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे. तर स्टँण्डर्ड चार्टड बँकेने टीएमबी शेअरचीहमी दिल्याने ६६ कोटींचा दुसरा दंड फेमाच्या न्यायालयीन यंत्रणेने ठोठावला आहे.