पुणे- पुण्यातील बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले यांच्या शिवाजीनगरमधील एबीआयएल कार्यालयावर ईडीने आज छापा मारला आहे. ईडीचे अधिकारी सकाळपासून छापेमारीसाठी पुण्यात आलेले आहेत. यापूर्वी ईडीने त्यांची फेमा कायद्याचे उल्लंघनप्रकरणी चौकशी केली होती.
राजकीय नेत्यांच्या चौकशीनंतर बांधकाम व्यावसायिकांच्या मालमत्ता ईडीच्या रडावर आल्याचे स्पष्ट दिसत आहे. बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले यांच्या कार्यालयावर ईडीने आज छापा मारला आहे.
पुण्यातील बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले यांची ईडीकडून तब्बल दहा तास नोव्हेंबर २०२० मध्ये चौकशी करण्यात आली आहे. विदेशी चलन प्रकरणात चौकशी करण्यात आल्याचे सूत्रांकडून कळत आहे.
विदेशी चलनप्रकरणी कारवाई -
विदेशी चलन प्रकरणी व काही महागड्या वस्तू परदेशातून आणल्याप्रकरणी ही चौकशी केली जात असल्याचे सूत्रांकडून कळते. 2007 मध्ये अशाच प्रकारची चौकशी करण्यात आली होती. आयकर विभागाकडूनही अविनाश भोसले यांच्या आर्थिक व्यवहाराबाबत छापेमारी करण्यात आली होती.
कोण आहेत अविनाश भोसले -
महाराष्ट्रातील प्रसिद्ध बांधकाम उद्योग व्यावसायिक आहेत. ते अविनाश भोसले इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड या बांधकाम कंपनीचे मालक असून कॉंग्रेसचे नेते व माजी वनमंत्री पंतगराव कदम यांचे व्याही आहेत.