नवी दिल्ली - सक्त अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) शनिवारी मनी लाँड्रिग प्रकरणात हरियाणामधील कंपनी आणि संचालकांवर गुन्हा दाखल केला आहे. एमएलएम मार्केटिंगमधून या कंपनीने ३१ लाख गुंतवणूकदारांना फसविल्याचा आरोप आहे.
हरियाणामधील हिसार येथे फ्युचर मेकर लाईफकेअर प्रा. लि. कंपनी आणि संचालक राधेशाम आणि बन्सी लाल सुंदर यांच्यावर ईडीने मनी लाँड्रिगचा गुन्हा दाखल केला आहे. पंचकुला येथील पीएमएलएच्या विशेष न्यायालयात ईडीने आरोपपत्र दाखल केले आहे. ईडीने आरोपींची २६१.३५ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे.
हेही वाचा-हलवा समारंभ संपन्न ; पहिल्यांदाच अर्थसंकल्प छपाईसाठी होणार नाही रवाना
ईडीच्या माहितीनुसार राधेशाम आणि बन्सीलाल हे हरियाणामधील रहिवासी आहेत. फ्युचर मेकर लाईफ केअर आणि एफएमएलसी ग्लोबल मार्केटिंग या दोन कंपन्या त्यांच्या मालकीच्या आहेत. या कंपन्यांच्या माध्यमातून त्यांनी मल्टीलेव्हल मार्केटिंगच्या (एमएलएम) नावाने गुंतवणूकदारांना पैसे गुंतवणूक करण्यासाठी आकर्षित केले. त्यामधून देशभरातील अनेक ठिकाणी आरोपींनी गुंतवणूकदारांची फसवणूक केली आहे.
हेही वाचा-अर्थसंकल्पात न्यायव्यवस्थेसाठी अधिक तरतूद करा; सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल
पोलिसातही आरोपींवर गुन्हा दाखल-
हरियाणा आणि तेलंगाणा पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल केल्यानंतर ईडीनेही त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. ईडीने आरोपींचा चंदीगड येथील फ्लॅट, दिल्लीतील दोन फ्लॅट आणि काही शेतजमीन, बँकेतील रक्कम आणि काही रोकड जप्त केली आहे. ही जप्त केलेली मालमत्ता एकूण २६१.३५ कोटी रुपयांची आहे.
दरम्यान, गुंतवणुकीवर आकर्षक परताव्याचे आमिष दाखवून गुंतवणूकदारांची फसवणूक झाल्याचे अनेकदा प्रकार समोर आले आहेत. गुंतवणूकदारांनी आमिषाला बळी न पडता माहिती घेऊन गुंतवणूक करावी, असे पोलिसांकडून आवाहनही करण्यात येते.