बंगळुरू- कोरोना महामारीतून अर्थव्यवस्था सावरत असताना ई-कॉमर्स क्षेत्राने चांगला वृद्धीदर अनुभवला आहे. डिसेंबर २०२० च्या तिमाहीत ई-कॉमर्सचा ३६ टक्क्यांहून अधिक वृद्धीदर राहिला आहे. विशेषत: वैयक्तिक काळजी, सौंदर्य आणि वेलनेस (पीसीबीडब्ल्यू) या क्षेत्रातील कंपन्यांच्या विक्रीत अधिक वाढ झाल्याचे एका अहवालात म्हटले आहे.
ऑक्टोबर ते डिसेंबर २०२० च्या तिमाहीत पीसीबीडब्ल्यू आणि एफएमसीजी आणि हेल्थकेअरच्या श्रेणीतील उत्पादनांच्या विक्रीत ९५ टक्के वाढ झाली आहे. तर इलेक्ट्रॉनिक्सच्या विक्रीत १२ टक्के वाढ झाली आहे. या उत्पादनांच्या वृद्धीदरात टायर २ आणि टायर ३ शहरांचा ९० टक्के हिस्सा राहिला आहे. कोरोना महामारी आणि टाळेबंदीत ग्राहकांच्या खरेदीच्या वर्तनात आमुलाग्र बदल झाला आहे. अनेक ग्राहक हे ऑनलाईन शॉपिंगकडे वळाले आहेत
हेही वाचा-नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ई-कॉमर्स कंपन्यांवर कारवाई करा-सीएआयटीची मागणी
अनेकजण घरातून काम करत होते. त्यांनी कमी किमतीमधील उत्पादने ही ऑनलाईन खरेदी करणे पसंत केल्याचे अहवालात म्हटले आहे. तर अनेकजणांनी पहिल्यांदाच किराणा ई-कॉमर्समधून खरेदी केला आहे. युनिकॉमर्सचे सीईओ कपील मखिजा म्हणाले की, कोरोना महामारीचा आणि टाळेबंदीचा ई-कॉमर्सवर स्पष्ट परिणाम दिसून आला आहे. ई-कॉमर्स क्षेत्र हे किरकोळ व्यापाराचा कणा झाले आहे. मोठ्या कंपन्यांनाही ई-कॉमर्सची क्षमता समजली आहे.
सणासुदीत ई-कॉमर्सने अनुभवले सुगीचे दिवस-
सणासुदीत १५ ऑक्टोबर ते २१ ऑक्टोबर २०२० दरम्यान ऑनलाईन विक्रीत २०१९ तुलनेत ५५ टक्क्यांची वाढ झाली होती. याबाबतची माहिती रेडसीरच्या सर्वेक्षणात दिसून आली आहे.
केंद्र सरकार आणणार नवे ई-कॉमर्स धोरण-
देशातील ई-कॉमर्स कंपन्यांमध्ये तीव्र स्पर्धा सुरू असताना नवे सरकारी धोरण आकाराला येत आहे. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्रालय हे नव्या ई-कॉमर्स धोरणावर काम करत आहे. निश्चितच या धोरणामध्ये डाटा आणि ग्राहकांच्या अधिकारासारख्या महत्त्वाच्या बाबींचा समावेश असेल, अशी माहिती वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्याने नुकेतच दिली.