नवी दिल्ली – खनिज तेल आणि वायू क्षेत्रात सुधारणा केल्यानंतर सरकार देशांतर्गत उत्पादित होणाऱ्या नैसर्गिक वायुच्या दरावरील नियंत्रण काढण्याचा विचार करत आहेत. त्यामधून देशांतर्गत नैसर्गिय वायू उत्पादनाला प्रोत्साहन मिळेल, अशी सरकारला अपेक्षा आहे. तसेच ओएनजीसी, ऑईल आणि वेदांत कंपनीसाठी बाजारपेठ एकसमान करण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे.
देशात गॅस ट्रेडिंगसाठी इंडिया गॅस एक्सचेंज ऑनलाईन सुरू करण्यात आले आहे. त्यामधून जगभरातील आणि देशातील नैसर्गिक वायुच्या स्पर्धात्मक किमती कळू शकणार आहेत. त्यानंतर नैसर्गिक वायूच्या किमतीवरील दराचे नियंत्रण काढण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. सरकारची थिंक टँक असलेल्या नीती आयोगाच्या उपाध्यक्षांनी नैसर्गिक वायुच्या किमती या बाजारासाठी नियंत्रणमुक्त ठेवण्याचे सूचविले होते. सरकारी सूत्राने सांगितले, की देशांतर्गत उत्पादित गॅसच्या किमती नियंत्रणाच्या नियमापासून मुक्त ठेवण्याच्या सर्व प्रस्तावावर विचार करत आहोत. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या सूचनेनंतर अंतिम प्रस्ताव तयार करण्यात येणार आहे. त्यानंतर लवकरात लवकर नवी व्यवस्था सुरू होईल, असे सूत्राने सांगितले.
गेल्या आठवड्यात केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनीही नैसर्गिक वायुबाबत सुधारणा करणार असल्याचे संकेत दिले होते. गॅसच्या किमतीवरील नियंत्रण भारत हळूहळू कमी करणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामधून विदेशी गुंतवणूक आकर्षित होईल, असा त्यांनी विश्वास व्यक्त केला होता.