नवी दिल्ली – कोरोनाचे संकट आणि अर्थव्यवस्था संकटात असली तरी पेट्रोल-डिझेलची दरवाढ सुरूच आहे. या दरवाढीमुळे राजधानीत डिझेलची किंमत प्रथमच प्रति लिटर 80 रुपयांहून अधिक झाली आहे. तसेच पहिल्यांदाच डिझेलचे दर पेट्रोलहून अधिक झाले आहेत.
सार्वजनिक तेल कंपन्यांनी 19 व्या दिवशी इंधनातील दरवाढ सुरूच ठेवली आहे. या 19 दिवसांमध्ये डिझेलचे दर प्रति लिटर सुमारे 10.63 रुपयांनी वाढले आहेत.
दरवाढीच्या एका दिवसाच्या विश्रांतीनंतर पेट्रोलचे दर प्रति लिटर 16 पैशांनी आज वाढले आहेत. गेल्या तीन आठवड्यात पेट्रोलचे दर प्रति लिटर 8.66 रुपयांनी वाढले आहेत. दिल्लीत पेट्रोलची किंमत 79.76 रुपये प्रति लिटरहून 79.92 रुपये झाली आहे. डिझेलचा दर काल (बुधवारी) प्रति लिटरहून आज 80.02 रुपये झाला आहे. ही माहिती सार्वजनिक तेल कंपन्यांनी दिली आहे.
नवी दिल्लीत डिझेलचे दर पहिल्यांदाच पेट्रोलहून अधिक झाले आहेत. विविध राज्यांमध्ये पेट्रोल व डिझेलचे दर हे तेथील व्हॅटप्रमाणे वेगवेगळे असतात. केवळ राजधानीत डिझेलची किंमत ही पेट्रोलहून अधिक आहे. कारण दिल्ली सरकारने गेल्या महिन्यात इंधनावरील व्हॅटमध्ये वाढ केली होती.
कोरोनाच्या संकटकाळात सरकारी तेल कंपन्यांनी 7 जूनपासून इंधनाचे दर वाढविण्यास सुरुवात केली आहे. यापूर्वी 82 दिवस इंधन दरवाढीला ब्रेक लागला होता. जूनमधील 19 दिवसांत डिझेलची किंमतही प्रति लिटर 10 रुपये 63 पैशांनी महागले आहे