नवी दिल्ली – नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (डीजीसीए) सुरक्षेच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या एअर एशिया इंडियाच्या दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांना निलंबित केले आहे. यामध्ये कॅप्टन मनीष उप्पल आणि कॅप्टन मुकेश नीमा यांचा समावेश आहे.
कॅप्टन मनीष उप्पल हे एअर एशिया इंडियाचे हेड ऑफ ऑपरेशन्स आहेत. तर कॅप्टन मुकेश नीमा हे हवाई सुरक्षेचे प्रमुख आहे. त्यांना डीजीसीएने 28 जूनला कारणे दाखवा नोटीस बजावली होती. त्यानंतर तीन महिन्यांनी त्यांचे निलंबन करण्यात आले आहे. याबाबत एअरएशिया इंडियाच्या प्रवक्त्याकडून प्रतिक्रिया मिळू शकली नाही.
काय आहे सुरक्षेच्या नियमांचे उल्लंघन-
एअर एशियामध्ये कॅप्टन म्हणून काम केलेले गौरव तनेजा यांनी सुरक्षेतील त्रुटीबाबतची चिंता डीजीसीएकडे व्यक्त केली होती. निलंबित करण्यात आलेल्या या वैमानिकाने सांगितले, की वैमानिकांना फ्लॅप 3 मोडवर विमाने जमिनीवर उतरविताना ठेवण्याचे प्रमाण 98 टक्के ठेवण्याचे सांगण्यात येत होते. त्यामुळे विमान इंधनाची बचत होते. जर वैमानिकांनी अशा प्रकारे विमाने जमिनीवर उतरविली नाही तर कंपनीकडून कार्यवाही करण्यात येते, तनेजा यांनी दावा केला आहे.
याबाबत केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री यांनी ट्विट केले. त्यांनी ट्विटमध्ये म्हटले, की जर फ्लॅप 3 मोडमध्ये जर काही घटना घडली तर वैमानिकाला प्रश्न विचारण्यात येणार आहे. त्याला किंवा तिला इंधनाची काळजी आहे की प्रवाशांच्या जीवनाची?
दरम्यान, नुकतेच केरळमधील कोझोकोड विमानतळावर एअर इंडिया एक्सप्रेसचे विमान उतरविताना अपघात झाला होता. या अपघातात वैमानिक, सह-वैमानिकांसह 19 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे.