नवी दिल्ली - विदेशात जाण्यावरील निर्बंध काढण्याबाबत जेट एअरवेजचे संस्थापक नरेश गोयल यांना दिल्ली उच्च न्यायालयाकडून कोणताही दिलासा मिळाला नाही. विदेशात जायचे असेल तर १८ हजार कोटी गॅरंटी म्हणून जमा करा, असे उच्च न्यायालयाने आदेश दिले आहेत.
कंपनी व्यवहार मंत्रालयाला जेट एअरवेजमध्ये अनियमितता आढळून आली आहे. त्यानंतर सरकारने गोयल यांच्याविरोधात लूक आऊट सर्क्युअलर काढले आहे.
गोयल आणि त्यांच्या पत्नी अनिता गोयल हे २५ मे रोजी देश सोडून जात असताना पासपोर्ट अधिकाऱ्यांनी त्यांना मुंबई विमानतळावर रोखले होते. गोयल दाम्पत्य हे दुबईमार्गे लंडनला जाणार होते. नरेश गोयल यांच्या जेट एअरवेज कंपनीने सरकारी बँकांचे कोट्यवधी रुपये थकविले आहेत. कंपनीची सेवा बंद असल्याने हजारो कर्मचाऱ्यांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली आहे.