चेन्नई - देशातील बेरोजगारीचे प्रमाण वाढल्याचे विविध आकडेवारीतून समोर आले आहे. अशा स्थितीत चेन्नईतील केंद्रीय पादत्राणे प्रशिक्षण संस्थेने १०० टक्के नोकरीचे आश्वासन दिले आहे. ही संस्था पादत्राणे निर्मितीचे प्रशिक्षण देते. या क्षेत्रात रोजगार आणि नोकरी देण्याची प्रचंड क्षमता असल्याचे संस्थेने म्हटले आहे.
पादत्राणे उत्पादनात तामिळनाडू हे देशातील आघाडीचे राज्य आहे. सीएफटीआयमधून कोर्स केल्यास प्रशिक्षित व्यावसायिक घडतात. तसेच क्षेत्रातील मागणीप्रमाणे कौशल्य शिकायला मिळत असल्याचे संस्थेचे संचालक के. मुरली यांनी सांगितले. विविध कोर्स करणाऱ्यांना १०० टक्के नोकरी दिली जात असल्याचे त्यांनी सांगितले. या क्षेत्रात २५ हजार जागा रिक्त असल्याचे त्यांनी सांगितले. अनेक कंपन्या प्रशिक्षित व्यावसायिकांना नोकरी देण्यासाठी संस्थेशी संपर्क करतात. अनेकजण नोकऱ्याबाबत प्रश्न उपस्थित करतात. मात्र आम्ही कोर्स करून खात्रीशीर नोकरी मिळविण्याऱ्यांची वाट पाहत आहोत, असे त्यांनी सांगितले.
पादत्राणे क्षेत्रात दर दोन महिन्यात सरासरी सहा ते सात हजार रिक्त जागा असतात. सीएफटीआय ही सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाच्या अखत्यारीतील स्वायत्त संस्था आहे. या संस्थेत कमी कालावधीचे सात तर जास्त कालावधीचे आठ कोर्स आहेत.