नवी दिल्ली - सीसीडीचे चेअरमन आणि व्यवस्थापकीय संचालक व्ही.जी.सिद्धार्थ हे बेपत्ता झाल्याच्या घटनेनंतर गुंतवणूकदार चिंताग्रस्त झाले आहेत. त्यानंतर कॉफी डे एन्टरप्रायजेस लि. कंपनीचे (सीसीडी) शेअर आज २० टक्क्यांनी घसरले आहेत.
सीसीडीच्या शेअरची मुंबई शेअर बाजारात २० टक्क्याने घसरण होऊन १५४.०५ रुपये किंमत झाली आहे. तर निफ्टीमध्ये २० टक्क्यांनी घसरण होऊन १५३.४० रुपये किंमत झाली आहे. मंगळवारी शेअर बाजाराला दिलेल्या कंपनीत म्हटले आहे, व्ही.जी.सिद्धार्थ यांच्याशी सोमवारी संध्याकाळपासून संपर्क होत नाही. त्यासंदर्भात आम्ही यंत्रणेची मदत घेत आहोत. कंपनीचे व्यावसायिकरित्या व्यवस्थापन केले जात. तसेच कंपनी सुरळीत चालू राहण्यासाठी नियमानुसार नेतृत्व करणारी टीम कार्यरत असल्याचे सीसीडीने शेअर बाजाराला दिलेल्या माहितीमध्ये म्हटले आहे.
सिद्धार्थ हे कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एस.एम.कृष्णा यांचे जावई आहेत. सिद्धार्थ हे साकलेशपूर येथे चारचाकीने जात होते. वाटेत त्यांनी चालकाला मंगळुरूच्या दिशेने वाहन घेवून जायला सांगितले होते, असे पोलिसांनी सांगितले.
दक्षिण कन्नड जिल्ह्यातील नेत्रावती नदीवरील पुलाजवळ सिद्धार्थ हे कारमधून उतरले. त्यानंतर ते चालण्यासाठी बाहेर पडले. त्यांनी चालकाला आपण येईपर्यंत वाट पाहा, असे सांगितले. मात्र दोन तासानंतर ते परतले नसल्याने चालकाने पोलिसांशी संपर्क साधून तक्रार दिली, अशी माहिती दक्षिण कन्नडचे उपायुक्त सेथिंल शशिकांत यांनी दिली. राज्य सरकारने नेत्रावती नदी पुलाजवळ सिद्धार्थ यांना शोधण्यासाठी शोधमोहीम सुरू केली आहे.