नवी दिल्ली- केंद्र सरकार तीन देशांबरोबर विमान प्रवास सुरू करण्यासाठी चर्चा करत असल्याची माहिती केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी दिली. यामध्ये काही अटी घालून विमान प्रवासासाठी परवानगी देण्यात येणार असल्याचे केंद्रीय मंत्री पुरी यांनी सांगितले.
केंद्रीय मंत्री हरदीप सिंह यांनी तीन देशांबरोबर आंतरराष्ट्रीय विमान प्रवासासाठी 'एअर बबल'ची व्यवस्था सुरू करण्यात येणार असल्याचे सांगितले. एअर बबल म्हणजे दोन देशांमध्ये प्रवाशांची सुरक्षितता लक्षात घेवून प्रवासासाठी काही अटी निश्चित करण्यात येतात. यामध्ये कायदेशीर प्रवेश आणि देशामधून बाहेर पडण्यासाठीचे नियम आदींचा समावेश आहे.
या देशांकरता सुरू होणार आंततराष्ट्रीय विमान प्रवास सेवा-
भारताने एअर फ्रान्सला 28 विमान उड्डाणांसाठी परवानगी दिली आहे. यामध्ये दिल्ली, बंगळुरू आणि मुंबईमधून 18 जुलै ते 1 ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या विमान सेवेचा समावेश आहे. तर अमेरिकेच्या युनायटेड एअरलाईन्सला 18 विमान उड्डाणांची परवानगी दिली आहे. ही आंतरराष्ट्रीय विमान सेवा 17 जुलै ते 31 जुलैदरम्यान होणार आहे. त्यासाठी लुफ्तान्सा विमान कंपनीबरोबर चर्चा सुरू असल्याची माहिती केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्र्यांनी दिली. संयुक्त अरब अमिराती आणि भारतामध्ये अडकून पडलेल्या प्रवाशांना विशेष विमान सेवा सुरू करण्यावर दोन्ही देशांची सहमती झाली आहे. ही विमान सेवा 12 जुलै ते 26 जुलैदरम्यान सुरू होणार आहे.
सध्या, केंद्र सरकारने भारतामधून आणि भारतामध्ये येणाऱ्या सर्व आंतरराष्ट्रीय विमान सेवांवर 31 जुलैपर्यंत निर्बंध लागू केले आहेत. असे असले तरी भारताने वंदे भारत मिशनमधून विदेशातील भारतीयांना मायदेशी आणण्यात येत आहे. जगभरातून 15 जुलैपर्यंत 6 लाख 87 हजार 467 भारतीयांना मायदेशी परत आणल्याचे हरदीप सिंह पुरी यांनी सांगितले.